पुण्याच्या मुंढवा (कोरेगाव पार्क) येथील वादग्रस्त जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना (पीए) नोटीस बजावली आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी केलेल्या अर्जावरून ही कारवाई करण्यात आली असून, लवकरच आणखी ८ ते १० जणांचे जबाब नोंदवून तपासाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
तक्रार आणि पोलिसांचा तपास:
‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीशी संबंधित व्यक्तींना या गैरव्यवहाराची पूर्ण कल्पना होती, असा दावा तेजवानी यांच्या अर्जात करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधितांची चौकशी सुरू आहे. मात्र, बोपोडीतील एका वेगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात (खडक पोलीस ठाणे) शीतल तेजवानी आणि 'अमेडिया' कंपनीचा संबंध नसल्याचे पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
घोटाळ्याचे स्वरूप आणि जमिनीचा इतिहास:
हा वाद मुंढवा परिसरातील तब्बल ४० एकर जमिनीचा आहे. १८१९ मधील 'महार वतन' असलेली ही जमीन १९५७ मध्ये शासनाकडे वर्ग झाली आणि पुढे भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. २००६ मध्ये मूळ वतनदारांकडून शीतल तेजवानी यांनी 'पॉवर ऑफ अटर्नी' मिळवली. त्यानंतर ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया' कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. तब्बल १८०० कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन कागदोपत्री अवघ्या ३०० कोटींना विकल्याचे दाखवण्यात आले.
२१ कोटींची मुद्रांक शुल्क सवलत:
आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली उद्योग विभागाकडून इरादा पत्र मिळवून या व्यवहारात २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क सवलत लाटण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने महसूल, जिल्हाधिकारी आणि मुद्रांक कार्यालयाकडून या जमिनीचे जुने सातबारा उतारे व सर्व संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
उच्च न्यायालयाचे ताशेरे आणि समितीचा अहवाल:
याप्रकरणी सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही आणि त्यांच्यावर गुन्हा का दाखल नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. दरम्यान, या संपूर्ण घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी नेमलेल्या विकास खारगे समितीने आपला ४,३९२ पानांचा विस्तृत अहवाल नुकताच राज्य विधिमंडळात सादर केला आहे.

