बीड - बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा सातत्याने वाढता असून शनिवारी बीड जिल्ह्यात 9 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली यातील 2 बीड शहरातील असून उर्वरित 5 परळी येथील तर राळेसांगवी ता.शिरुर येथील 1 आणि बागझरी ता.अंबाजोगाई येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
शनिवारी बीड जिल्ह्यातील तब्बल 251 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामुळे शनिवारच्या अहवालाकडे सवार्र्ंचे लक्ष लागले होते. बीड जिल्हा रुग्णालयातील 97 आणि बीडच्या कोव्हिड केअर सेंटरमधील 41 स्वॅबमुळे शहरात आणखी किती रुग्ण सापडणार याची उत्सुकता होती. यातील बीड शहरातील अजिजपुरा भागातील 1 आणि डी.पी.रोड भागातील 1 अशा 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर परळीच्या पाच रुग्णांसाह राळेसांगवी ता.शिरुर यथील 1, बागझरी ता.अंबाजोगाई येथील 1 रुग्णही पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान शनिवारी दुपारीच बीड शहराच्या बालेपीर भागातील एक रुग्ण औरंगाबाद येथे तर आष्टी तालुक्यातील कारखेल येथील एक रुग्ण नगरमध्ये पॉझिटिव्ह आढळून आला होता.
अंबाजोगाईत कंटेन्मेंट झोन
दरम्यान कोरोनाला अनेकदिवस रोखलेल्या अंबाजोगाई शहरातही उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा कंटेन्मेंट झोन जाहीर झाला आहे. शहराच्या आनंदनगर भागात उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा संपर्क आल्याचे समोर आल्याने प्रशासनाने हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.