बीड दि.२७(प्रतिनिधी): शहरातील द्वारकादास शामकुमार दुकानासमोरून दुचाकीवरून जात असतात एका महिलेच्या गळ्यातील १४ ग्रॅमचे मिनिगंठन लंपास केल्याची घटना रविवार (दि.२५) रोजी रात्री घडली असून ७८,००० हजारांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळाला असून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंगची आणखी एक घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गीता पुरुषोत्तम भोसले (वय ३८) रा. शिवाजी धांडे नगर, शंभुराजे नगर, बीड या रविवार (दि.२५) रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता त्या पती व मुलासह रिलायन्स स्मार्ट बाजार येथे किराणा सामान खरेदीसाठी गेल्या होत्या.रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास खरेदी करून त्या स्कुटीवर मुलासह तर पती दुसऱ्या दुचाकीवरून घरी परतत होत्या. त्या जालना रोडवरून बार्शी रोडकडे जात असताना द्वारकादास शामकुमार दुकानासमोर मागून एका युनिकॉर्न मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम दुचाकीवर आले. त्यांनी गीता भोसले यांच्या गळ्यातील सुमारे १४ ग्रॅम वजनाचे व अंदाजे ७८,००० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगर रोडच्या दिशेने पळ काढला. घटनेनंतर भोसले व त्यांच्या मुलाने स्कुटीवरून संशयितांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.

