माजलगाव दि.२५(प्रतिनिधी): शहरातील अनेक सराफा व्यापारी गावोगावी जाऊन सोन्या-चांदीचे दागिने विकण्याचे काम करतात. अशाच एका सराफा व्यापाऱ्याकडून आज(दि.२५) रोजी भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवत ६० लाख रुपयांचे दागिने पळवल्याची घटना घडली आली आहे. या घनटेने शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते नेहमी आपल्या दुचाकीवरून विविध गावांमध्ये जाऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असतात. आज सकाळी ९ वाजता ते घरातून निघाल्यानंतर, साडेनऊच्या सुमारास तालखेड फाटा परिसरात पोहोचले. तेथून पुढे खेर्डा गावाकडे जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्यांनी पाठलाग सुरू केला.रस्त्यावर कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या बाईकसमोर आपले वाहन आडवे लावले. त्यानंतर त्यांनी दागिन्यांची बॅग देण्याची मागणी केली. व्यापाऱ्याने नकार दिल्यानंतर, चोरट्यांनी कोयता, गज यांसारखी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर व्यापाऱ्याच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून आरोपी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले. गायके यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे विविध दागिने (अंदाजे किंमत: ₹५० लाख) आणि ३ किलो चांदीचे विविध दागिने (अंदाजे किंमत: ₹१० लाख), असा एकूण सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना भरदिवसा घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. .
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती काही क्षणांतच माजलगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, तात्काळ आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

