पुणे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत. महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Alliance) नेत्यांनी एकत्र बैठक करुन ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधे देखील घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना दुसरीकडे दोन पक्षांमधील अंडरस्टँडिंग देखील निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं चित्र आहे. त्यामुळं न्यायलयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील एकोप्याने लढवण्याचा निर्णय घेतलाय.

