Advertisement

निवडणूक आयोगाचे वराती मागून घोडे,छाननी संपत आल्यावर बदलले निकष

प्रजापत्र | Tuesday, 18/11/2025
बातमी शेअर करा

बीडः राज्यातील नगरपालिका निवडणूकांसाठीची छाननी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आता राज्य निवडणूक आयोगाने अचानक नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांबाबतचे निकष बदलले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   यापूर्वी राजकीय पक्षांच्या उमेदवाराला, तो डमी किंवा पर्यायी असेल तरी एक सुचक पुरेसा असायचा. एका सुचकावर देखील पर्यायी उमेदवाराचा अर्ज वैध करण्याच्या सुचना असल्याने बहुतांश पक्षांनी पर्यायी उमेदवारांचे अर्ज एकाच सुचकावर भरले आहेत.आता आज छाननी प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून नगराध्यक्ष पदाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तर अनेक ठिकाणी सदस्य पदाच्या अर्जावरही निर्णय झाला आहे. मात्र ऐनवेळी राज्य निवडणूक आयोगाने नव्याने निर्देश देत केवळ एकच सुचक असलेले पर्यायी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविलेले अनेक अर्ज नव्याने बाद करण्यात येत आहेत. यामुळे आता संवैधानिक प्रश्न निर्माण होत असून ठिकठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. छाननी प्रक्रिया सुरु झाल्यावर आयोग नवे निकष कसे लाऊ शकतो हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Advertisement

Advertisement