वडवणी दि.२५(प्रतिनिधी): कुंडलिका नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अक्षय बाबासाहेब जाधव (वय २८) रा. कुप्पा या युवकाचा मृतदेह आज, गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी ७:४० वाजता तुकडेगाव येथील बंधाऱ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळला.
वडवणी तालुक्यातील कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरात राहणारा अक्षय जाधव मंगळवारी (दि.२३) सायंकाळी शेतातून घरी परतत होता. तेव्हा दुथडी भरून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरात वाहून गेला होता.ही घटना कळताच महसूल प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली होती. पोहण्यासाठी गेलेल्या मुलांनी बंधाऱ्यात मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली. या घटनेमुळे कुप्पा गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे.