मुंबई दि. २५ (प्रतिनिधी) : धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना विशेष कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाने केलेल्या खरेदीवरुन मागच्या काळात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडेंच्या काळात झालेली खरेदी नियमानुसारच झाली असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. डीबीटी आणि विशेष कृती आराखडा या दोन भिन्न बाबी असून याचिकाकर्त्यांनी जाणीवपूर्वक त्या एकत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षण देखील उच्च न्यायालयाने नोंदवत याचिकाकर्ता तुषार पाडगिलवारला एक लाखाचा दंडही ठोठावला.
न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
राज्य शासनाने १२ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन यांच्यामार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या निर्णयावरून धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा हा शब्द वापरून अनेकांनी मुंडेंची व कृषी विभागाची बदनामी केली होती.
विशेष म्हणजे या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
राज्य शासनाने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, २०१६ मधील डीडीटी योजना व २०२३-२४ मधील विशेष कृती आराखडा ही दोन्ही योजना स्वतःच्या स्वरूपात वेगळी असून त्यांची उद्दिष्टे ही केवळ शेतकऱ्यांचे हीत एवढेच असल्याची भूमिका मांडली. जी न्यायालयाने उचलून धरली.
या निर्णयामुळे राज्य शासनाच्या कृषी उत्पन्नवाढीच्या विशेष कृती आराखड्याला न्यायालयीन मान्यता मिळाली आहे. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेली ही थेट खरेदी प्रक्रिया पारदर्शक व शेतकऱ्यांच्या हितास पूरक असल्याचे निकालात नोंदवले आहे. त्यामुळे या विषयाच्या आडून धनंजय मुंडे यांची बदनामी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने जोरदार चपराक लगावली आहे.
न्यायालयाचा निर्णय
न्यायालयाने नमूद केले की डीबीटी योजना व विशेष कृती आराखडा यांचा एकमेकांशी संबंध नाही. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही.
याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले की याचिकाकर्ते केवळ आपल्या व्यवसायाच्या हितासाठी न्यायालयात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा वापर करून अनेकांनी शासनाच्या तत्कालीन धोरणावर चुकीचे भाष्य करून बदनामी साध्य केली.याचिकेत “खाजगी व्यावसायिक हेतू” असल्याचे म्हणत फेटाळली आहे. विशेषतः याचिकाकर्ते तुषार पाडगिलवार यांनी न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर करत "फोरम शॉपिंग" केल्याबद्दल ₹1 लाख दंड ठोठावण्यात आला.
याचिकाकर्त्यांचा खोटेपणा
विशेष म्हणजे स्प्रेयर निर्माते तुषार पडगीलवार यांनी स्वतःच्या खाजगी हितासाठी प्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण निर्णय विरोधात जाईल हे लक्षात येताच त्यांनी मुख्य मागण्या मागे घेतल्या. त्यानंतर त्यांनी नागपूर न्यायालयात जनहित याचिकेच्या नावाखाली काही शेतकऱ्यांना पुढे करत खोटे बिल्स व खोटे पुरावे दाखवून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यावरही न्यायालयाने भाष्य केले आहे.
सत्यमेव जयते!
दरम्यान शेतकरी वर्गास उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विचार करून शेतकऱ्यांच्या हीतास प्राधान्य देणारा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याच्या विरोधात अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली; मात्र आज न्याय देवतेने सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला असून आपला तो निर्णय योग्यच होता, असे म्हणत सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया या निकालावर व्यक्त केली आहे.