Advertisement

सोशल मीडियावर जातीयद्वेष पसरवणाऱ्या भैय्या पाटील विरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल

प्रजापत्र | Tuesday, 27/05/2025
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - मसाजोग सरपंच हत्येपासून सोशल मीडियावर द्वेषमूलक लिखाण करून जाती जातीत द्वेष पसरवून तेढ निर्माण करणे, भडकाऊ मजकूर प्रसिद्ध करणे, एका संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणारे लिखाण करणाऱ्या, तसेच पोलीस अधिकाऱ्यांची नावे, जाती लिहून त्यांच्यावर तथ्यहीन आरोप करणाऱ्या शेकडो पोस्ट फेसबुक व एक्स सोशल मीडियावर करून जाती जातीत विष पसरविण्याचे काम करणाऱ्या  भैय्या पाटील नामक व्यक्ती विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांच्या फिर्यादीवरून बीड सायबर पोलीस ठाण्यात  रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भैय्या पाटील याने बीड जिल्हा घडणाऱ्या विविध घटनांचा आधार घेऊन एका संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणारे द्वेषमूलक लिखाण केले आहे व आजही ते सुरू आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत यांनी जाती विषयक पोस्ट करण्यारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भैय्या पाटील विरुद्ध सात एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. अखेर तपासाअंती सायबर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा माहिती तंत्रज्ञान कायदा 84c तसेच बी एन एस 196 कलमंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक उस्मान शेख करत आहेत. 
 

अजित पवारांच्या कार्यालयातून झाली होती हकालपट्टी! 
भैय्या पाटील हा पूर्वी उपमुख्यंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात जन संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होता मात्र त्याच्या सततच्या जातीयवादी भूमिकेमुळे दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातून भैय्या पाटील याची हकालपट्टी केली असल्याची माहिती असून तो सध्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया विभागाचा प्रमुख पदाधिकारी आहे. 

 

कठोर कारवाईची अपेक्षा
जातीयवादी  मानसिकतेतून जाती जातीत विष पेरणाऱ्या, भावना भडकवण्यासाठी प्रक्षोभन पसरविणाऱ्या भैय्या पाटील सारख्या विखारी वृत्ती विरोधात बीड पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे

 

या विकृती ठेचणे 
बीड जिल्ह्यात कोणत्याही घटनेला जातीय रंग देऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या विकृती फोफावल्या आहेत. यामुळे सामाजिक दरी वाढत आहे. भैय्या पाटील नामक इसमावर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी अशा विकृती विरोधात पहिले पाऊल टाकले आहे. आता अशा सर्वच प्रकरणात कठोर भूमिका घेत पोलीसांनी अशा विकृती ठेचणे आवश्यक आहे. 

 

Advertisement

Advertisement