बीड-मागच्या अनेक वर्षांपासून भैय्या,अण्णा,काका,दादाच्या आशीर्वादाने खुर्चीवर चिकटून बसलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अखेर नवनीत कॉवत यांनी गुरुवारी (दि.२२) बदल्या केल्या आहेत.आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही वशिलेबाजी अथवा पैशांचा घोडेबाजार न भरविता तब्बल ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.एसपींनी बदल्यांसाठी राबविलेला पारदर्शी कारभार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून अनेकांना यामुळे मात्र धक्का बसला आहे.
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी स्वतः बदल्यांमध्ये लक्ष घालून कालावधीपूर्ण झालेले आणि निकषात बसणाऱ्या कर्मचारी आणि सहाय्यक फौजदारांना बदलीपासून संरक्षण मिळणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते.अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तरीही स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी आपल्या 'गॉडफादर'कडे धाव घेत एसपींना बदल्यांमध्ये झुकते माप देण्यासाठी सूचना करायला लावल्या.अगदी स्वतः नवनीत कॉवत यांनी बदल्यांसाठी अनेकांशी संवाद साधताना कर्मचाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले. पण जे कर्मचारी दीर्घकाळापासून एकाच विभागात आणि शहरात कार्यरत होते त्यांना थेट दणका दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पोलीस दलात पहिल्यांदाच ६०६ कर्मचाऱ्यांची थेट खांदेपालटच करण्यात आली असून एसपींनी स्वतः बदल्यांसाठी तीन दिवसांपासून वेळ दिला होता अशी माहिती आहे.ते कार्यालयात आले तरी त्यांचे सर्व लक्ष बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच होते.नवनीत कॉवत यांनी बीड जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घालून दिलेल्या वस्तुपाठ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून एसपींना लोकप्रतिनिधींना देखील मी कोणाचेच चुकीचे ऐकणार नसल्याचा देखील या माध्यमातून संदेश दिल्याचे पाहायला मिळत आहे.