गुन्हेगारीची घटना कोणतीही असेल आणि कोणीही केलेली नसेल तर ते वाईटच, कारणे काहीही असोत , कोणीतरी कायदा हातात घेणे देखील चुकीचेच आणि झुंड जमवून टगेगिरी करण्याचे तर समर्थन होऊच शकत नाही, अशा विकृतींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशा लोकांना शासन व्हायलाच हवे , पण कोठेही काही घटना घडली . की लगेच त्याला जातीय वळणावर कसे नेता येईल असे पाहणारी आणि तसा विद्वेष पसरविणारी समाजमाध्यमे जमत सध्या सामाजिक शांततेलाच चूड लावायला बसली आहे त्याचे काय ? परळीमधील घटनेचा एक व्हिडीओ आला , माणुसकीच्या नात्याने त्या घटनेचा निषेध होणे स्वाभाविक आहे, पण लगेच काही महाभागांनी कसलीही माहिती नसताना. कोणतीही खातरजमा न करता त्या प्रकाराला कोणत्या तरी गॅंगचे नाव द्यायचे, कोणत्यातरी जातीविरुद्ध विद्वेष पसरवायचा, या घटनेला कोणत्यातरी जातीवरचा हल्ला म्हणून दाखवायचा प्रयत्न करायचा असली विकृती समाजमाध्यमांवर सुरु केली. हे केवळ एका प्रकरणापुरते नाही, कोणतीही घटना घडली की समाजातील काही महाभागांना त्यात वेगळाच 'रंग ' दिसतो आणि विद्वेष पसरविण्याची संधी म्हणून हे लोक त्याकडे पाहतात, अशा विकृत मानसिकतेवर देखील कारवाई व्हायलाच हवी.
----
मागच्या सहा महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य पार बिघडले आहे. जातीय तणाव ठिकठिकाणी धुमसत आहे. कोणत्याही ठिकाणी काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडतात , त्याचा निषेध झालाच पाहिजे आणि गुन्हे करणारे कोणीही असतील, कोणाच्याही संबंधित असतील, कोणासोबतही फोटो काढणारे असतील तरी त्यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. जे कोणी मिसरूड देखील फुटत नाही तोच, झुंड जमवून एखाद्याला अमानुष मारहाण करतात , त्यांना कायदा काय असतो हे समजलेच पाहिजे. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी व्यवस्थेने प्रयत्न करावेत त्याशिवाय तरुणाईमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी मानसिकता आणि झुंडशाही कमी होणार नाही. अशा लोकांना वाचवायला कोणी पुढे येणार असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी, याबाबतही काही दुमत नाही. त्यामुळे परळी तालुक्यातील एका तरुणाला मारहाण करतानाच जो व्हिडीओ समोर आला, त्यातील आरोपी जे जे कोणी म्हणून असतील , त्यांना सोडता कामा नये . त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी.
मात्र हे सारे होत असताना, परळी प्रकरणातील व्हिडीओ समोर येताच , कोणतीही खातरजमा न करता, प्रकरण काय आहे याची माहिती न घेता , ज्या काही महाभागांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हेतू नेमका काय आहे ? समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांवर व्यक्त होण्याचा प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे हे मान्य , पण असे व्यक्त होताना , किमान पूर्ण माहिती घेऊन व्यक्त होणे अपेक्षित असते. कोणत्याही घटनेला जातीय वळणावर न्यायचे आणि एखाद्या जातीवरील हल्ला म्हणून समोर आणायचे , पुन्हा कोणतीही माहिती नसताना कोणत्यातरी नावाने ते प्रकरण खपविण्याचा प्रयत्न करायचा , या विकृतीला काय म्हणणार ? गुन्हेगाराला आणि गुन्हेगारीला जात नसते , आणि गुन्हेगारी कोणाचीही असेल तर ती वाईटच असते, पण म्हणून प्रत्येक प्रकरणात पीडित आणि आरोपीनची जात शोधायचा प्रयत्न झाला तर समाज व्यवस्थाच कोसळून पडेल . परळीच्या प्रकरणाला सुरुवातीला जो रंग देण्याचा प्रयत्न झाला , त्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षकांना या प्रकरणात आवाहन करताना यात सर्व जातीचे आरोपी आहेत, त्यामुळे याला जातीय रंग देऊ नये असे सांगण्याची वेळ यावी , हे जातीय विद्वेष पसरविणाऱ्या काही मूठभर विकृतींनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून एकूणच सामाजिक स्वास्थ्याला कसे वेठीस धरले आहे हे समजायला पुरेसे आहे.
सगळे तसे नसतात, पण काहींना समाजातील शांतताच नको आहे का ? असे वाटावे असे वर्तन काही समाजमाध्यमी महाभागांचे आहे. त्यांनी झुंडीच्या मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. समाजमाध्यमांवर बहुतांश लोक कसलीही खातरजमा न करता एखादा विषय पुढे पसरवतात आणि एकदा का असे करणारी झुंड तयार झाली , मग झुंडीला विवेक राहत नाही याचा पूर्ण अभ्यास समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक ट्रेंड चालविणारांचा असतो. त्यामुळे जे लोक समाजमाध्यमांमध्ये जाणीवपूर्वक विद्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत, त्यांच्यावर देखील अंकुश लागायला हवा. एखाद्या प्रकरणात चुकीच्या माहितीवर व्यक्त होऊन जर सामाजिक शांतता बिघडणार असेल तर ते लोक देखील कायद्याला उत्तरदायी आहेत हे व्यवस्थेने दाखवून द्यायला हवे. समाजातील बहुसंख्य वर्गाला सामाजिक शांतता हवी असते, त्यांना जातीय तेढ नको असते, सर्वांसोबत चांगले संबंध हवे असतात, मात्र हे असे राहू नये यासाठी कोणाचे 'राजकारन ' चालते आणि त्या राजकारणासाठी जर कोणत्याही घटनेचा वापर केला जात असेल तर अशा विकृती देखील खपवून घेतल्या नजणार नाहीत हा संदेश देण्याची वेळ आली आहे. जे टगेगिरी करतात, कायदा हातात घेतात त्यांना दयामाया दाखविणे नकोच , पण चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने समाजात दुही पसरविण्यासाठी जर कोणी माथी भडकावीत असतील तर असे डोके देखील शोधले पाहिजेत आणि त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे . न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे , जो दुर्बल आहे त्याच्या पाठीमागे समाजशक्ती उभी केली पाहिजे हे सारे मान्य , पण काहीच माहित नसताना , कोणत्या तरी जातीने अन्याय केल्याची हाकाटी पिटली जात असेल आणि रोज कोणत्या ना कोणत्या जातीला बदनाम केले जात असेल तर मी ते कोणीही असतील , कोणत्याही बाजूचे असतील , त्यांच्यावर अंकुश लागायलाच हवा.

प्रजापत्र | Sunday, 18/05/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा