बीड दि. १७ (प्रतिनिधी ) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या(Local elections) संदर्भाने आता निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला आहे. जिल्हापरिषदांमधील (ZP)सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी तसेच प्रभाग रचनेला वेग देण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला निर्देश दिल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने(RDD) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या आणि इतर माहिती तात्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्यशासनाला निर्देश दिल्यानंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचाल सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत, त्याअगोदर जिल्हापरिषदांची सदस्य संख्या(Number of members) निश्चित करण्यास सांगितले आहे.
त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून सदस्यसंख्या निश्चित करण्यासाठी ग्रामीण लोकसंख्या, वेगवेगळ्या तालुक्यातील ग्रामीण क्षेत्र आणि ग्रामीण लोकसंख्येत काही बदल झाले असल्यास ती माहिती तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत . त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील जिल्हापरिषदांची सदस्यसंख्या निश्चित होणार आहे. त्यानंतर जिल्हापरिषद , पंचायत समिती गट गण रचना , त्यानंतर आरक्षण सोडत आणि पुढील कार्यक्रम होणार आहेत.

बातमी शेअर करा