Advertisement

सुटलिया पेंडीचा आळा....

प्रजापत्र | Saturday, 30/01/2021
बातमी शेअर करा

बीडःएकेकाळी संदीप क्षीरसागरांवर जीव ओवाळणारे कार्यकर्ते आज आ. संदीप क्षीरसागरांपासून दुरावत आहेत. सत्ता असताना लोक जवळ येत असतात, येथे मात्र सत्ता असताना उलटे का होत आहे, आणि कार्यकर्त्यांच्या पेंडीला  'भैय्या' म्हणून असलेला आळा का सुटतोय याचा शोध घेण्याचे आव्हान आ. संदीप क्षीरसागरांसमोर असणार आहे.
 सव्वाचार वर्षांपूर्वी झालेल्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना आघाडीने दाखविलेली कर्तबगारी सर्वांचे डोळे दिपविणारी होती, पहिल्याच प्रयत्नात आघाडीचे २१ नगरसेवक निवडून आले आणि एमआयएमच्या मदतीने संदीप क्षीरसागरांनी बीड नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदासह जवळपास सर्वच सभापतीपदांवर आपल्या समर्थकांना बसविले. अडीच दशकांपासून नगरपालिकेच्या राजकारणात असलेल्या काका डॉ. भारतभूषण क्षीरसागरांची कोंडी करण्यात त्यावेळी पुतणे संदीप क्षीरसागर यशस्वी झाले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही संदीप क्षीरसागरांनी ३ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले, यावेळी त्यांनी थेट मोठे चुलते जयदत्त क्षीरसागरांना आव्हान दिले होते. काकू नाना आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागरांना मिळत असलेले यश खरे तर सर्वांच्याच भुवया उंचाविणारे होते. अगदी शरद पवारांच्यासुध्दा. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी 'मी आणखी संदीप क्षीरसागरांची कॅटॅगिरी ठरविलेली नाही' असे जाहिरपणे म्हणणाऱ्या शरद पवारांनी पक्षात संदीप क्षीरसागरांनाच प्राधान्य द्यायचे ठरविले आणि अगदी जयदत्त क्षीरसागरांना राष्ट्रवादी सोडावी लागली. नंतरच्या काळात संदीप क्षीरसागर स्वतः आमदार झाले, ते देखील काका जयदत्त क्षीरसागरांना पराभूत करुन. ती ३ वर्ष आ. संदीप क्षीरसागरांच्या राजकीय प्रवासाचा सुवर्णकाळ होता. ग्रामीण भागातील राजकारण करणाऱ्या संदीप क्षीरसागरांना बीड शहराने भरभरुन साथ दिली आणि संदीप क्षीरसागर आमदार झाले. कारण त्यांना ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांची एकी करता आली. पेंडी बांधता आली. आणि या पेंडीचा आळा होता 'कार्यकर्ते जपणारा , कार्यकर्त्यांसाठी काहीही करणारा, कायम उपलब्ध असणारा नेता' अशी असलेली संदीप क्षीरसागरांची ओळख. या ओळखीनेच संदीप क्षीरसागरांना प्रतिकूल राजकीय परिस्थितीत आमदार केले.
मात्र  मागच्या वर्षभरात कार्यकर्त्यांच्या पेंडीचा हा भावनिक आळाच सुटत चालल्याचे चित्र आहे. खरेतर नगरपालिका निवडणुकीच्या वर्षभरानंतरच एमआयएममध्ये फूट पडल्याने आघाडीच्या पालिकेवरील वर्चस्वाला धक्का बसला होता. मात्र तरीही नंतरचे ३ वर्ष काही अपवाद वगळता कार्यकर्ते आघाडीसोबत कायम होते. मात्र मागच्या वर्षभरात हे चित्र झपाट्याने बदलत चालले आहे. विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील कार्यकर्ते दुरावत असल्याचे चित्र होते, पण आता शहरातील कार्यकर्ते देखील दुरावत आहेत. चार वर्षांपूर्वी आघाडीची पालिकेत असणारी संख्या आता निम्म्यावर आल्याचे चित्र आहे. पंचायत समितीवर आ. संदीप क्षीरसागरांची सत्ता आहे, मात्र तिथेही सदस्य अस्वस्थ आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता यावी म्हणून चार वर्षांपूर्वी संदीप क्षीरसागरांनी बिनशर्त मदत केली होती, त्यावेळी राष्ट्रवादीचे सत्तेचे गाणित चुकले मात्र वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद पुन्हा राष्ट्रवादीकडे आल्यावर तर संदीप क्षीरसागर गटाला काही मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, मात्र तो 'हक्क' आ. संदीप क्षीरसागरांनी का सोडला हे अजूनही समोर आलेले नाही.
नगरपालिकेत उपाध्यक्ष ऐकत नाहीत, पंचायत समितीतली कामे होत नाहीत, जिल्हा परिषदेतली कामे होत नाहीत, जुन्या कार्यकर्त्यांनाही आमदारांना थेट बोलता येत नाही हे कार्यकर्त्यांचे आक्षेप आहेतच,त्यासोबतच विरोधक आमदारांच्या निकटवर्तीयांवर टक्केवारीचा आरोप करतायत आणि आमदार स्वतः यातील कशावरच कांहीच बोलत नाहीत असे चित्र आज बीड मतदारसंघात आहे. त्यातूनच आ. संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांच्या पेंडीचा आळा सुटतोय आणि कार्यकर्ते दुरावताहेत. विरोधकांचे आरोप काय आहेत, किंवा कार्यकर्त्यांचे आक्षेप काय आहेत, यापलीकडे जाऊन आ. संदीप क्षीरसागरांना निर्णय घ्यावे लागतील. पेंडीचा आळा पुन्हा आवळण्याचे आव्हान आ. संदीप क्षीरसागरांसमोर असणार आहे. यावरच मतदारसंघाची राजकीय समिकरणे ठरणार आहेत कारण नऊ महिन्यात बीड नगरपालिकेच्या तर वर्षभरात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत.

Advertisement

Advertisement