आष्टी-येथील आरोग्य विभागाने गुरुवारी तब्बल २३३ कोरोना यौद्ध्यांना लस दिली. विभागाने एका दिवसात उद्दिष्टापेक्षा दुप्पट कोरोना लसीकरण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लातूर येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डाॅ .एकनाथ माले यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले.
कोरोना प्रतिबंधक लसिकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रतिदिन १०० कोरोना यौद्ध्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात गुरूवारी दिवसभरात उदिष्टापेक्षा दुप्पट म्हणजेच २३३ कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्या. हे लसीकरण करताना राज्यात गुरूवारी आष्टी अव्वल स्थानी राहिले. कोरोना प्रतिबंधक ही लस आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, खाजगी डाॅक्टर आणि त्यांचे कर्मचारी यांना देण्यात आली.
यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. राहुल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. गुरूवारी एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्याने आष्टीच्या आरोग्य विभागाचे लातुर येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले यांनी विशेष कौतुक केले.
बातमी शेअर करा