Advertisement

संघर्षातलं सत्तासुत्र

प्रजापत्र | Monday, 21/04/2025
बातमी शेअर करा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना ' राज्यकर्ती जमात' होण्याचा संदेश दिला होता, याचा अर्थ प्रत्येकालाच सत्तेची पदे मिळतील असा नव्हताच. मात्र सत्तेच्या चाव्या फिरविणारे हात आंबेडकरी अनुयायांचे असावेत असा त्याचा अर्थ काढता येतो. तोच विचार घेऊन मागच्या २ दशकात  बाबुराव पोटभरे यांच राजकीय योगदान राहिलेलं आहे. संघर्षातून आलेला हा सामान्य कार्यकर्ता आज सत्तासुत्राचा महत्वाचा नेता झालेला आहे.
 
ही घटना असेल २५-२६ वर्षांपूर्वीची ,  गोपीनाथराव मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री होते. त्यावेळी जिल्ह्यातील  एका सामाजिक विषयावर थेट त्यांना पोस्टर दाखविण्याचे आंदोलन एका तरुणाने केले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे गृहमंत्री देखील होते, पोलिसांनी लगेच कडे केले, आता त्या तरुणाचे काय होणार हा अनेकांना पडलेला प्रश्न होता , पण गोपीनाथरावांनी त्या तरुणाच्या आक्रमकतेमागची तळमळ पाहिली आणि त्या तरुणाला चर्चेसाठी बोलावले. त्यावेळचा तो तरुण म्हणजे आजचे बहुजन नेतृत्व बाबुराव पोटभरे. जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी समाजाला जवळून अनुभवले. या समाजमधली राजकीय शक्ती समजून घेतली. बाबासाहेबांचा 'सत्ताधारी जमात ' होण्याचा जो संदेश होता, त्या संदेशामधील गर्भित अर्थ समजून घेतला आणि आपल्या समाजाच्या , आंबेडकरी अनुयायांच्या मताची शक्ती किती आहे , आणि त्या शक्तीच्या आधारे आपण राजकारणाला आपल्याला हवी ती दिशा कशी देऊ शकतो याचाही अभ्यास केला. नुसता अभ्यास करून ते थांबले नाहीत , तर त्याला कृतीची जोड दिली आणि बीड जिल्ह्याच्या , तशा सरंजामी राजकारणाला आंबेडकरी मतांना गृहीत धरून चालणार नाही हा विचार करायला भाग पाडले . मागच्या अडीच तीन दशकातला बाबुराव पोटभरे यांचा राजकीय सामाजिक प्रवास हा आंबेडकरी विचारधारेचा राजकीय परीघ वाढविणारा ठरला आहे.

तसं पाहायला गेलं तर आंबेडकरी राजकारण करणाऱ्या नेत्यांना मुख्यप्रवाहात फारसं स्थान मिळविता येत नाही हे कटू असले तरी वास्तव , पण या वास्तवाला छेद देण्याचे काम बाबुराव पोटभरे यांनी सुरु केले आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या घरची बैठक गजबजू लागली , ती आजही गजबजलेली असते. आंबेडकरी नेत्यांनी केवळ दलितांच्याच प्रश्नावर बोलायचे असे जणू अपेक्षिले जात असल्याच्या परिस्थितीत बाबुराव पोटभरे यांनी वेगवेगळ्या समूहांच्या प्रश्नांवर बोलायला सुरुवात केली , व्यापाऱ्यांच्या समस्या मांडायला सुरुवात केली, नागरिकांच्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी व्हायला लागले आणि त्यांच्या सहभागाचे स्वागत देखील व्हायला लागले, म्हणजे एका अर्थाने समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये त्यांची स्वीकारार्हता वाढायला लागली . अगदी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयात देखील जाहीर भूमिका घेणारा नेता म्हणून बाबुराव पोटभरे यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या या राजकारण , समाजकारणातील व्यापकतेनेच त्यांची राजकीय शक्ती देखील वाढविली .
आज माजलगाव मतदारसंघाचे राजकारण असेल किंवा बीड जिल्ह्याचे , या राजकारणात ज्यांना यश मिळवायचे आहे, त्यांना बाबुराव पोटभरे यांच्या शुभेच्छा घ्याव्या  लागतातच. निवडणुकीच्या काळात कोणी दिवसाउजेडी तर कोणी अगदी मध्यरात्री देखील पोटभरेंच्या माजलगावच्या 'शाक्य' बंगल्यावर येऊन जातात याचे साक्षीदार अनेक आहेत. राजकारणात राज्यकर्ती जमात होणे म्हणजे आपल्याला पोषक अशा व्यक्तींना सत्तेच्या साखळीत आणणे आणि पर्यायाने सत्तेच्या सूत्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे हेच अपेक्षित असते , मागच्या अडीच तीन दशकाच्या राजकारणात बाबुराव पोटभरे यांनी हे साधले आहे. आज कोणाच्याही निवडणुकीची वरात पोटभरेंच्या मांडवातूनच जाते हे वास्तव आहे.
अर्थात हे सारे सहज झाले असेही नाही. यामागचा संघर्ष देखील मोठा आहे. अनेक राजकीय चढउतार , अनेक राजकीय सामाजिक स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली, जगली. जसे आनंदाचे प्रसंग आले तसेच राजकारणातील उणेपण देखील कधी स्वीकारावे लागले . अभिनंदन आणि उपेक्षा अशा साऱ्या रस्त्यावरून प्रवास करीत आज बाबुराव पोटभरे यांनी हे राजकीय अस्तित्व कमावले आहे. यामागे त्यांच्यावर विश्वास ठेवणारी आंबेडकरी जनता आणि जातीपाती पलीकडचा सामान्य माणूस यांची मोठी शक्ती आहे . या संघर्षातून आलेल्या नेतृत्वाचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा .
  

Advertisement

Advertisement