समाजमाध्यमे म्हणजे ज्यांना आवाज नाही अशांना देखील व्यक्त होता यावे यासाठीचे माध्यम होते , मात्र या मंचाचा वापर केवळ गरळ ओकण्यासाठी किंवा द्वेष , विद्वेष पसरविण्यासाठी होणार असेल तर आपला समाज कोणत्या दिशेने जात आहे? समाजमाध्यमांवरील लोकांच्या संवेदना खरोखर गोठून गेल्या आहेत का ? आणि माध्यमांबद्दल तर काय बोलावे ? कोणीतरी काहीतरी आरोप करते आणि त्यातील तथ्य काय असेल याचा जराही विचार न करता एकूणच साऱ्या व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला माध्यमे तयार होतात , याला काय म्हणायचे ?
मागच्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून राज्यभरात बीडचीच चर्चा आहे. बीडमधील वादग्रस्त विषय संपायलाच तयार नाहीत. एखादा प्रश्न आता संपेल असे वाटत असतानाच पुन्हा त्याच्याच संदर्भाने कोणता तरी नवा मुद्दा समोर आणला जातो, यात खरोखर काही तथ्य आहे का याचा सारासार विचार करण्याची तयारी जिथे मुख्यप्रवाहातील म्हणविणाऱ्या माध्यमांची देखील राहिलेली नाही तेथे समाजमाध्यमांवरील उतावळ्यांकडून अशी अपेक्षा करणे देखील गैरच. पण यामुळे एकूणच समाजव्यवस्थेत एक दारी निर्माण होत आहे आणि द्वेष वाढत आहे याची काळजी कोणालाच करायची नाही. पुन्हा असे काही मांडायला कोणी समोर आले तर 'तुम्हाला त्यांच्या कुटुंबाच्या वेदना दिसत नाहीत का ? ' असा सवाल करायला हे उतावीळराव मोकळे , जणूकाही कोणाच्या मरणाची प्रतीक्षा करणाऱ्या पोस्ट टाकल्या म्हणजेच एखाद्या मयताच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे, असले तर्कट कोणत्या संस्कारातून येते हे देखील एक कोडेच आहे. मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा, त्यांच्या कुटुंबाला आधार मिळायला हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण हा न्याय न्यायालयीन मार्गानेच मिळणार आहे आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी समाज पुढे येत आहे. समाजमाध्यमांवर कोणाच्या तरी दुसऱ्याच्या कुटुंबावर, लेकरांवर टीका करून , कोणाच्या तरी मरणाची प्रतीक्षा करून पुन्हा त्याला संतोष देशमुख यांच्या न्यायाशी जोडणे हे कोणत्याही संवेदनशील किंवा विचारक्षमता जागृत असलेल्या व्यक्तीला पटणारे नाही. मात्र समाजमाध्यमांमधील काही बहाद्दरांचे कर्तृत्वच इतक्यापुरतेच सीमित असेल तर त्याला काय म्हणावे ? कोणत्याही गोष्टींची खातरजमा न करता त्यावर व्यक्त होणे , मग ते कोणाच्या आजारपणात त्याच्या मृत्यूची प्रतीक्षा करणे असेल किंवा एखाद्याच्या हत्येनंतर त्याच्या चारित्र्याबद्दल समाजमाध्यमांमधून तो केवळ एखाद्या संघटनेचा आहे म्हणून चिखलफेक करणे असेल हे सारे तर्काच्या पलीकडचे आहे.
समाजमाध्यमांचे एकवेळ ठीक , तेथे कोणता एक चेहरा नसतो, पण माध्यमांचे काय ? एखाद्या व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी माध्यमांना कोणताही चेहरा चालतो ? त्या चेहऱ्याची समज किती किंवा त्याच्या बोलण्यात काही तथ्य आहे का याचा विचार करण्याची देखील आवश्यकता माध्यमांना वाटत नाही. रणजित कासले सारखा कोणीतरी निवडणुकीत गडबडी झाल्याचा व्हिडीओ काय प्रसारित करतो आणि कासले खरोखर त्यावेळी तेथे होता का याची साधी शहानिशा करण्याची आवश्यकता माध्यमांना वाटत नाही, ईव्हीएमबद्दल समाजमनामध्ये संशयाचे वातावरण आहे हे मान्य , पण म्हणून कोणीही काहीही बोलावे आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देत राहावे यातून काय सध्या होणार आहे ? जो व्यक्ती निवडणुकीच्या प्रक्रियेतच कोठेच नव्हता , त्याला असले काही आरोप करण्याचा अधिकार असतो का ? याची खातरजमा कोणी करायची? ती माध्यमांची जबाबदारी नाही का ? पण सध्या कोणत्याही विषयात घाई करायची आणि कोणतेही प्रकरण कसेही करून कोणत्या तरी व्यक्तीभोवती आणून सोडायचे हे जे काही चालले आहे, ते माध्यमांकडून अपेक्षित नाही. आज एका व्यक्तीबद्दल ते होत आहे याचा काहींना आनंद वाटेल , पण हा आनंद असुरी आहे असेच म्हणावे लागेल, कारण एकदा माध्यमे असल्या बिन बुडाच्या वृत्तांना डोकावली तर त्यातून उद्या अनेकांचे चारित्र्य हणन झाल्याशिवाय राहणार नाही. आज आनंदणाऱ्या चेहऱ्यांनी मग उद्या यात कोणाचाही नंबर लागू शकतो यासाठी देखील तयार असायला हवे.