बीड दि. १२(प्रतिनिधी) : बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या(Beed) पूर्वसंध्येला बाजारतळावर संगीत रजनीची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र यावेळी पोलीसांनी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नये असा अहवाल दिल्याचे सांगत रात्री १२ वाजेपर्यंत संगीत रजनी करायला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बीडच्या बाजारतळावर संगीत रजनी होत असते. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. या संगीत रजनीच्या माध्यमातून बहारदार भिम गीतांचा कार्यक्रम होत असतो आणि यासाठी बीडसह (Beed)परिसरातून आंबेडकरी जनता उपस्थिती लावित असते. रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली समता ज्योत बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर पोहचते आणि तेथे बाबासाहेबांना अभिवादन करुन आंबेडकरी जनता घरी जाते ही अनेक वर्षाची परंपरा झालेली आहे.
या ही जयंती समितीच्या वतीने संगीत रजनीच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता.मात्र याबाबत पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी बाजार भरतो आणि परिसरातून गर्दी वाढू शकते असे सांगत रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात हरकत घेतल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत संगीत रजनी घेण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीची भावना आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम होतो, यावेळी कसलेही अनुचित प्रकार होत नाहीत. आतापर्यंत नेहमी प्रशासनाने परवानगी दिलेली आहे, यावेळीच परवानगी नाकारण्यात आली हे अन्याय करणारे असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

प्रजापत्र | Saturday, 12/04/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा