Advertisement

संपादकीय अग्रलेख - सलोख्याला लागलेली कीड ठेचा

प्रजापत्र | Wednesday, 02/04/2025
बातमी शेअर करा

 रमजान ईदच्या एक दिवस अगोदर मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणण्याचा प्रकार असेल किंवा ते वातावरण शांत होत असतानाच एका मंदिरावर हिरवे झेंडे दाखविण्याचा प्रकार असेल, ही विकृती येथील  सामाजिक सलोख्याला सुरुंग लावणारी आहे . कोणीतरी व्यसनाच्या आहारी जाऊन केले असेल किंवा रंगाच्या बहरात हे झाले असेल इतक्या सहजपणे घ्यावेत असे हे प्रकार नक्कीच नाहीत. मागच्या काही काळात बीड जिल्ह्यात आणि इतरत्रही जाणीवपूर्वक सामाजिक सलोखा कसा धोक्यात येईल माशा घटना घडत आहेत, या घटनांमागचा कार्यकारणभाव तपासला पाहिजे. सामाजिक सलोख्याला चूड लावू पाहणारे हात आणि डोके व्यवस्थेने शोधले पाहिजे आणि ही मानसिकता ठेचली  देखील पाहिजे.
 

संपूर्ण देशभर गुढी पाडव्याच्या आणि रमजान ईदच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच बीड जिल्ह्यात एका गावात मस्जिददमध्ये स्फोट घडविण्यात आला. गावातीलच दोघांनी विहिरी फोडण्यासाठी वापरात येणारी स्फोटके वापरून हेघडवून आणले. ईद दुसऱ्या दिवशी असतानाही गावातील आणि जिल्ह्यातीलच मुस्लिम समाजाने जो संयम दाखविला त्यामुळे हे प्रकरण अधिनिक चिघळले नाही. प्रशासन, पोलीस, लोकप्रतिनिधी सर्वानीच या कमी पुढाकार घेतला आणि याचे पडसाद इतरत्र उमटू नयेत हे पहिले. त्याच मस्जिदमध्ये तातडीने इफ्तारचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकीकडे हे होत असतानाच गेवराई तालुक्यातच एका नाथपंथीय मंदिरावर हिरवे झेंडे लावण्याचा प्रकार समोर आला .तेथेही गावकऱ्यांच्या संयमाचे कौतुकच करावे लागेल.मात्र या दोन्ही घटनांमुळे  बीड जिल्ह्यात कोणालातरी जाणीवपूर्वक इथले वातावरण कलुषित करायचे आहे का असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
धार्मिक स्थळे कोणत्याही धर्मियांची असोत, त्याचे पावित्र्य राखले जायला हवे. सर्व धर्मियांची शिकवण तीच असते, मात्र मागच्या काही काळात सातत्याने देशातच धार्मिक उन्माद कसा वाढेल हे पहिले जात आहे. असा धार्मिक उन्माद वाढविणारी एक विकृती मागच्या काही काळात फोफावत आहे. तरुणाईला धार्मिक ध्रुवीकरणाच्या नावाने एकत्र करतानाच त्यांच्या मनात परधर्मीयांबद्दल द्वेष निर्माण करणारी मानसिकता निर्माण केली जातेय हे गंभीर आहे. अर्धमसला प्रकरणात आज भलेही, ते दोघे आरोपी नशेच्या आहारी गेले होते, जुन्या वादातून त्यांनी हे कृत्य केले असे सांगितले जात असेल आणि कदाचित हे खरेही असेल, पण नशेच्या आहारी जाऊन जुन्या वादातून एख्याडे धार्मिक स्थळ उडवून देण्याची मानसिकता ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या तरुणांची होत असेल तर ही बाब अधिक घटक आहे. आपण आपल्या पिढ्यांना नेमके काय शिकवीत आहोत याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद कोणत्याच रंगाचा नसतो, किंवा कोणत्याही रंगाचा दहशतवादाशी संबंध नसतो, पण धार्मिक कट्टरतेच्या नावाखालीजर विध्वंसाचा वारसा पुढच्या पिढीला दिला जाणार असेल, धार्मिकतेच्या नावाखाली कोणीही जर विद्वेष शिकविणार किंवा पसरविणार असेल तर हे अधिक घटक आहे. असली मानसिकता देशाच्या, समाजाच्या कोणाच्याच हिताची  नाही. एखादे धार्मिक स्थळ उडवून देण्याची प्रेरणा नेमकी कोठून येते? त्यांनी असे काय वाचले, पाहिले, ऐकले की त्यांना कथित रागातून थेट धार्मिक स्थळ उध्वस्त करावे वाटले याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का ? त्यांना कोणाची शिकवण होती का याच्या मुळापर्यंत जावे लागेल. तसेच कोणत्याही धार्मिक स्थळावर कोणीही जायचे आणि कोणतेही झेंडे लावायचे, त्यातून आक्रमकता किंवा वर्चस्व सिद्ध करायचे ही मानसिकता देखील निषेधार्हच आहे. असल्या साऱ्याच मानसिकतेचे किडे समाजासाठी महारोगापेक्षाही अधिक घातक  आहेत. असे करणारे जे कोणी असतील, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्याशिवाय समाजात कठोर संदेश जाणार नाही.

 

Advertisement

Advertisement