दुखरीबाजू /संजय मालाणी
बीड दि. १५ : एखादी घटना घडत असताना सोयीस्कर मौन पाळायचे आणि सारे काही शांत झाल्यावर किंवा हाताबाहेर गेल्यावर काही तरी भाष्य करायचे हा शरद पवारांचा (Sharad Pawar politics)राजकीय पिंड आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक विषयावर ते पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर बोलते झालेले आहेत , आता बीडजिल्ह्याबद्दल देखील त्यांची प्रतिक्रिया त्याच वळणाची आहे . बीड जिल्हा राजकीय गुन्हेगारी आणि जातीयवादाच्या वणव्याचे(Fire) चटके अनेक वर्षांपासून सहन करीत आहे. त्यावेळी हे सारे प्रकार थांबविणे शक्य असतानाही मौन पाळून बसलेले शरद पवार आता मात्र 'बीड जिल्ह्यातील अशा घटना रोखायला हव्यात ' असे म्हणतात , हा सारा प्रकार पश्चातबुद्धीचा(After thought) आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणावर तसा शरद पवारांचा प्रभाव (Pawar Dominant politics) नेहमीच राहिलेला आहे आणि बीड जिल्ह्यातील राजकारण एककल्ली होणार नाही, या ठिकाणी वेगवेगळे गट जिवंत राहतील आणि ते परस्परांवर कुरघोड्या करीत राहतील हे देखील शरद पवारांनी कायम पहिले. किंबहुना एकाच्या विरोधात दुसऱ्याला कधी अंधारातून तर कधी उजेडातून शक्ती, बळ(Power) आणि सहकार्य देण्याची भूमिका शरद पवारांनी वारंवार घेतलेली आहे. त्यांच्यासोबत काम करीत असताना त्यांना निष्ठा अर्पण केलेल्या केशरकाकू क्षीरसागर असतील किंवा शिवाजीराव पंडित किंवा विनायक मेटे या नेत्यांसोबत देखील शरद पवार कसे वागले हे जिल्ह्याला माहित आहे. सुंदरराव सोळंके , बाबुराव आडसकर याना देखील शरद पवारांच्या तिरक्या राजकारणाचा(Unpredictable Politics) फटका अनेकदा बसला.मात्र असे असले तरी बीड जिल्ह्याने शरद पवारांवर प्रेमच केले आणि त्यांच्यामागे, त्यांच्या विचाराच्या मागे राजकीय शक्ती उभी केली. शरद पवारांनी कोणालाही राजकीय शेंदूर लावला तर त्याला राजकीय देवत्व द्यायला या जिल्ह्यातील जनता कमी पडली नाही. त्यामुळे आता जर इतक्या वर्षानंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे शरद पवारांना वाटत असेल तर त्याच्या अपश्रेयातून शरद पवार स्वतः तरी कसे सुटणार आहेत ?
बीड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक अस्वस्थतेचा सध्या स्फोट झाला आहे हे खरे असले, तरी ही अस्वस्थता अनेक वर्षांची आहे. किंबहुना ९० च्या दशकापासूनच याची सुरुवात झालेली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde Politics) राजकारणातले एकेक इमले चढत होते आणि त्यातूनच मग ओबीसींच्या राजकीय महत्वकांक्षा निर्माण झाल्या, वाढत गेल्या , त्यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला शह (Check mate)द्यायचा म्हणून मग शरद पवारांनी बीड जिल्ह्यात जे राजकारणाचे खेळ खेळले, त्यावेळी त्यात त्यांनी साधनशुचिता पाळली का ? आज ज्यांच्या संदर्भाने राजकीय गुन्हेगारीचे, राजकारणात धोके दिल्याचे, ज्यांच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीची व्हिडीओ येत आहेत त्यातील बहुतांश, किंबहुना सर्वच कधी ना कधी शरद पवारांच्याच तालमीत होते. पक्षांतर हा जर राजकीय व्यभिचार असेल तर असे अनेक व्यभिचार (Misbehaviour)शरद पवारांनीच पवित्र केले आहेतच, किंवा त्यांना मूकसंमती तरी दिली आहेच. आज ज्यांच्या संदर्भाने वेगवेगळे आरोप होतात, त्या सर्वांनाच मग ते धनंजय मुंडे असतील , सुरेश धस असतील , किंवा प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर किंवा आणखी कोणी, या सर्वांना त्या त्या वेळी राजकीय बळ देऊन मोठे करणारे शरद पवारच होते. या सर्वांचे जिल्ह्यात काय चालते किंवा यांचे कार्यकर्ते कोण आहेत , हे शरद पवारांना माहित नव्हते असे म्हणणे त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीवर अन्याय करणारे ठरेल . आजच नव्हे तर अगदी मागच्या ३-४ दशकात अनेकांनी शरद पवारांच्या जिल्ह्यातील जहागीरदारांच्या अनेक कहाण्या शरद पवारांना सांगितल्या होत्याच, स्वतः शरद पवारांचे जासूस किंवा निकटवर्तीय बीड जिल्ह्यात कमी नाहीत , जिल्ह्यात कोठेही खुट्ट झाले तरी शरद पवारांना लगेच कळते, पण त्या त्या वेळी शरद पवारांना त्या त्या जहागीरदाराची आवश्यकता होती, म्हणून असेल कदाचित पण शरद पवारांनी त्याकडे कानाडोळा केला हे ढळढळीत वास्तव आहे. आता या परीस्थित सध्या जिल्ह्यातील नेतृत्वावर टीका करणे शरद पवारांना सोयीचे आहे, म्हणून कदाचित शरद पवारांना जिल्ह्यातील परिस्थिती किती विदारक झाली आहे याची जाणीव झाली असावी. त्यांनी ' सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी ' अशी केलेली अपेक्षा योग्यच आहे, पण असे सारे करण्याची क्षमता या हातांमध्ये येऊ देण्यात काही वाटा शरद पवारांचा देखील आहेच, त्याचे काय ?

प्रजापत्र | Sunday, 16/03/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा