राजकारणातील गुन्हेगारी (Criminalisation of politics) आणि गुंडांना मिळणारा राजकीय आश्रय हे काही आता कोणत्याच भागात नविन राहिलेले नाही. राज्यात नव्हे तर देशभरातच राजकारणाचा हा एक नवा पायंडा पडलेला आहे. सत्तेच्या जीवावर मस्तवालपणा पोसायचा आणि त्याच मस्तवालांच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवायची हे काही अपवाद वगळता सार्वत्रिक सत्य झालेले आहे. मात्र मधल्या काळात बीड जिल्ह्यातच, त्यातही एका विशिष्ट भागातच राजकीय गुन्हेगारी वाढल्याचे ढोल वाजविले गेले, त्यातून जिल्ह्याची बदनामी झाली, कधीही भरून न येणारे नुकसान झाले पण आता जिल्ह्यातल्या इतर भागातले व्हिडीओ, ऑडिओ, रिल्स व्हायरल होवू लागल्या आहेत. राजकीय गुंडगिरीत कोणीच कोणाला कमी नाही असे चित्र पुन्हा एकदा सर्व जिल्ह्याला पहायला मिळत आहे.
बीड (Beed)जिल्हा हा एकेकाळी परिवर्तनवादी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. वेगवेगळ्या अध्यात्मिक गडांचा प्रभाव असलेला जिल्हा, कष्टकर्यांचा जिल्हा ही या जिल्ह्याची ओळख होती. राजकारणात सर्वविचारधारांना स्थान देणारा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जात होते. देशपातळीवर जितके म्हणून काही पक्ष असतील त्यातील बहुतांश पक्षांना बीड जिल्ह्यात कोणी ना कोणी पदाधिकारी होते, इतकी राजकीय व्यापकता बीड जिल्ह्याने दाखविलेली. मात्र मागच्या काही दशकात राजकारणाच्या गुन्हेगारीचा जो अध्याय देशपातळीवर लिहिला जावू लागला त्यात बीड देखील अपवाद राहिले नाही, किंबहूना रोजगाराच्या दुसर्या कोणत्या सोयी उपलब्ध नसल्याने कोणत्या तरी राजकीय नेत्यासाठी आपले आयुष्य झिजवायचे आणि त्यातून काही तरी पदरात पडतयं का? हे पहायचे. फार काही नाही झालं तर आपल्या आडव्यातिडव्या कामांना संरक्षण मिळाले तरी बस असे माननारा एक वर्ग निर्माण झाला आणि या दादा, अण्णा, भाई म्हणविणार्यांची(Mussel power) क्रेझ होवू लागली. तरुणाईला हे सारे लोक आपले आयडॉल वाटू लागले. याला कोणताही नेता किंवा कोणताही पक्ष अपवाद राहिला असे नाही, या सगळ्या अण्णा, दादा, भाई लोकांना राजकारणात पद, प्रतिष्ठा आणि पैसा सारे काही मिळवून द्यायचे आणि मग निवडणूकीच्या वेळी त्यांचा पुरेपूर वापर करून घ्यायचा हे बीड जिल्ह्यात कमी अधिक फरकाने सर्वच राजकीय नेत्यांनी केले. गुंड प्रवृत्तीचे काही लोक तर काही काळ एका मतदारसंघात, तिथल्या नेत्यासोबत जमले नाही तर शेजारच्या मतदारसंघात मिरवत असलेले आणि त्या त्या नेत्यांच्या जवळ जात असलेले सर्वांनी पाहिले. बीड जिल्हावासियांसाठी ही बाब काही नवीन नव्हती.
मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातले सारेच वातावरण बदलले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर सार्या गुंडगिरीचे माहेरघर म्हणजे जणू परळी आहे असे चित्र निर्माण केले गेले. त्यातून देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला का? हा प्रश्न बाजुलाच आहे पण बीड जिल्ह्याच्या अब्रूची लक्तरे देशपातळीवर टांगली गेली, त्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. आता त्या पाठोपाठ वेगवेगळ्या मतदारसंघातील अशाच राजकीय गुंडगिरीचे व्हिडीओ रोज समोर येत आहेत. कुठे लोकप्रतिनिधींचे, कुठे त्यांच्या निकटवर्तीयांचे व्हिडीओ, ऑडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. म्हणजे राजकारणात ‘हमाम में सब नंगे’ असल्याचे चित्र अधिक प्रकर्षाने दिसू लागले आहे.
बीड जिल्ह्यात हे सारे काही नव्याने होत आहे असे काही नाही, मुळात इथल्या जनतेच्या मानसिकतेचाही प्रश्न आहेच. निवडणूकीच्या वेळी आपला प्रतिनिधी निवडताना आपल्यासाठी पोलीस ठाण्यात कोण फोन करू शकतो, आपल्या खांद्यावर हात टाकून टपरीसमोर कोण उभा राहू शकतो हे निकष लावून जर निवडणूका होणार असतील, आपल्या नेत्याने अमूक अधिकार्याला किती झापले याचा आनंद जर कार्यकर्ते व्यक्त करणार असतील तर त्या जिल्ह्यात या सगळ्यांपेक्षा वेगळी परिस्थिती असणार तरी कशी? म्हणून मग सुसंस्कृत म्हणविणार्या राजकारण्यांना देखील अनेकदा इच्छा नसतांना ‘फोना फोनी’चा रस्ता स्विकारावा लागला हे देखील कटू असले तरी वास्तव आहे.
अधिकार्यांनी देखील बीडमध्ये यायचे, इथे प्रचंड माया जमवायची, एका टर्ममध्ये टार्गेट पुर्ण झाले नाही तर फिरून पुन्हा यायचे आणि सारे काही झाल्यानंतर बदलून गेल्यावर पुन्हा बीडला दुषणे द्यायची हे प्रकार देखील सुरूच आहेत. मध्यंतरी जिल्हा दंडाधिकारी राहिलेल्या एका व्यक्तीचे बीडवरचे पुस्तक चर्चेत आले होते. त्यात त्यांनी बीडबद्दल खूप काही भिषण असल्याचे मांडले होते पण जिल्हा दंडाधिकारी म्हणून ही सारी अधोगती रोखण्यासाठी त्यांचे हात कोणी धरले होते याचे उत्तर मिळाले नाही, त्यांच्या काळातील कर्मचारी भरती नंतर रद्द करावी लागली ही त्यांची कर्तबगारी पण असेच लोक बीडला बदनाम करत आहेत.
मध्यंतरी प्रजापत्रने या सार्या प्रकारावर प्रकाशझोत टाकला होता, आज एका नेत्याच्या समोर असणारे बुम उद्या दुसर्या व्यक्तीसमोर असतात. हे लोक कोणाचेच नसतात, त्यांना सनसनाटी हवी असते हे लिहिले होते, आता त्याचाच प्रत्यय येत आहे. रोज कोणाचातरी व्हिडीओ, कोणाची तरी रेकॉर्डिंग समोर आणली जाते, यातून आपणच आपले नागडेपण आरशात निरखायचे अशी परिस्थिती झाली आहे आणि
‘चिंगारी का खेल बुरा होता है,
दुसरो के घर जलाने का सपना
अपने यहाही खरा होता है।’
या ओळींची प्रकर्षाने आठवण होत आहे.