अंजली दमानिया (Anjali damaniya) आणि अर्धवट ज्ञानावर व्यक्त होणे हे जणू समीकरण झाले आहे. किंबहुना कोणी अर्धवट माहितीवर बोलत असेल तर त्याला अंजली दमानिया प्रवृत्ती म्हणायला देखील अतिशयोक्ती वाटणार नाही अशी काही विधाने अंजली दमानिया सातत्याने करीत आलेल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडेंच्या (dhanjay munde) संदर्भाने जीआर काढण्याबद्दलचे त्यांचे आरोप देखील त्याच धाटणीचे आहेत.
स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणविणाऱ्या अंजली दमानिया (Anjali damaniya) यांनी (म्हणविणाऱ्या हा शब्द प्रयोग यासाठी की त्यांनी समाजोपयोगी असे कोणते मोठे कार्य केले किंवा कोणता तरी फार मोठा सामाजिक विषय हाती घेऊन त्यात त्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो विषय धसास लावला असे ठामपणे सांगता येईल अशी फार मोठी सोडा , पाच दहा देखील उदाहरणे देता येणे अवघड आहे ) पुन्हा एकदा जोरदार अभिनिवेश दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी डागल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर कोणी आरोप करू नयेत असेही नाही. किंवा कोणाला काय आरोप करायचे आहेत , त्याचे त्याला स्वातंत्र्य आहेच, आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही, मात्र ज्यावेळी स्वतःला राज्यव्यापी चेहरा म्हणविणारी, भासविणारी व्यक्ती एखाद्या संवैधानिक पदावरील व्यक्तीबद्दल आरोप करीत असते, व्यवस्थेला प्रश्न विचारीत असते किंवा एखाद्या संवेदनशील प्रकरणावर व्यक्त होत असते , त्यावेळी त्या व्यक्तीने जबाबदारीने व्यक्त होणे अपेक्षित असते. त्या जबाबदारीचा आणि अंजली दमानिया यांचा काही संबंध कधी आला असेल का असा संशय निर्माण व्हावा असेच त्यांचे वागणे राहिलेले आहे. संतोष देशमुख (santosh deshmukh) हत्या प्रकरणात आरोपींचा मृत्यू झाला आहे असले बेधडक विधान कोणतीही खात्री न करता त्यांनी केले होतेच. त्यानंतर शस्त्र कायद्याची किंवा शस्त्र परवाने देण्याची पद्धत काय असते याची माहिती न घेताच त्यांनी केलेली विधाने चर्चेचा विषय ठरली होतीच . त्यानंतर प्रशासनामधील अधिकाऱ्यांची जात काढण्याचे त्यांचे विधान तर त्यांच्या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे होतेच. मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्या कार्यकाळातील कृषी खात्यातील कथित घोटाळ्यांबद्दल त्यांनी मोठमोठे आरोप केले, त्यावर मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तरे देखील दिली गेली, त्याबद्दल आम्हाला काही भाष्य करायचे नाही, किंवा कोणाला क्लिनचिट द्यायची नाही. मात्र आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी मंत्री मुंडे (munde) यांनी मंत्रिमंडळाची मान्यता न घेताच जीआर काढले असा शोध लावला आहे. त्यामुळे याबद्दल बोलणे भाग आहे. कोणीही उदात्त हेतू दाखवत समाजात खोटे नाटे पसरवू नये आणि समाजमन ज्यांच्याकडे गांभीर्याने पाहते त्यांच्याकडून समाजाचा बुद्धिभेद होऊ नये हे देखील तितकेच महत्वाचे असते. उदात्त हेतू समोर दाखवून बुद्धिभेद करण्यामागे अनेकदा असे करणारच अंतस्थ हेतू वेगळाच असल्याचे राज्याने खूपवेळा अनुभवले आहे.
तर अंजली दमानिया (Anjali damaniya) ज्यावेळी आरोप करतात, त्या वेळी त्या त्या व्यवस्थेचा थोडाही अभ्यास करीत नाहीत हेच पुन्हा पुन्हा समोर आले आहे. राज्य सरकारचे शासन निर्णय कसे निघतात, कोणत्या बाबी मंत्रिमंडळासमोर जातात , कोणत्या बाबीचे अधिकार मंत्र्यांचे असतात, जीआर काढण्याच्या प्रक्रियेत नेमके कोण कोण सहभागी असते याची साधी माहिती देखील दमानिया यांनी घेतल्याचे त्यांच्या आरोपांमधून जाणवत नाही. यासाऱ्या बाबींची त्यांना माहिती नसेल असे गृहीत धरणे म्हणजे त्यांच्या एकूणच सामाजिक कार्यावर आणि वकुबावर अन्याय केल्यासारखे होईल. मग सारे काही माहित असताना अंजली दमानिया जाणीवपूर्वक समाजाचा बुद्धिभेद करीत आहेत का ? ज्या आरोपांचे काहीच होणार नाही, किंवा जे आरोप मुळातच कायद्याच्या कसोटीवर टिकणारच नाहीत , तसले आरोप करून त्यांना केवळ वातावरण निर्मिती करून प्रकरण तापते ठेवायचे आहे का ? राज्यात हे सारे काही प्रथमच होत आहे असे नाही, यापूर्वी गो रा खैरनार असतील किंवा धर्माधिकारी आणि इतरही काही सनदी अधिकारी, त्यांनी त्या त्या काळात असेच बेछूट आरोप तत्कालीन नेतृत्वावर केले होतेच, पण त्यातील किती प्रकरणात तथ्य निघाले ? किती प्रकरणे दोषसिध्दीपर्यंत पोहचली ? मग केवळ सनसनाटी निर्माण करण्यामागे असल्या प्रवृत्तीचा हेतू असतो तरी काय याचा देखील विचार समाजाने करणे आवश्यक झाले आहे.
भ्रष्टाचार जर दुसऱ्याचा असेल तर त्याची चीड समाजातील प्रत्येकालाच असते, त्यामुळे कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप होणार असतील तर समाजमन त्याची चवीने चर्चा करते , पण त्या चर्चेतून अंतिमतः साधले काय जाते ? मागच्या अनेक वर्षातला याबद्दलचा अनुभव असल्या चर्चांमधून काहीच हशील होत नाही , काही दिवस चर्चा होतात, कोणाचे तरी कोणते तरी अंतस्थ हेतू साध्य होतात , समाजाच्या मानसिकतेचा फायदा उठवत कोणीतरी स्वतःची प्रसिद्धी करून घेतो आणि नंतर मात्र चर्चा करणाऱ्या समाजाच्या पदरी काहीच पडत नाही हाच आजपर्यंतचा भ्रष्टाचाराच्या आरोप सत्राचा परिपाक आहे. आज हे कोणाला पटणारे किंवा पचणारे नसेल तरी काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश व्हिस्ल ब्लोवर म्हणवणारांच्या बाबतीतला हाच कटू अनुभव आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणी, अर्धवट माहितीवर म्हणा किंवा अर्धवट हुशारी दाखवून, अनेक तथ्ये लपवून कोणावर तरी आरोप करीत असते त्यावेळी त्यांच्या हेतूबद्दल देखील समाजाने विचार करायलाच हवा.