जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे (manoj jarange) हे आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते उपोषण करत आहेत. जरांगे हे अंतरावालीत सातव्यांदा उपोषण करत आहेत. यावेळी बोलताना जरांगे यांनी सरकारवर आरोपही केले. जुन्या मागण्यांसाठी नव्याने उपोषण करत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे, तसा जीआर काढावा. (shinde)शिंदे साहेबांनी समिती स्थापन केली, तिला मुद्दतवाढ देण्यात यावी, असेही जरांगे यांनी म्हटले.
पुढे बोलताना मनोज जरांगे (manoj jarange)म्हणाले की, एक वर्ष झाले मराठा समाज रस्त्यावर आहे. गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने केली. तातडीने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेच पाहिजे. काही जातीयवादी अधिकाऱ्यांनी नोंद सापडूनही प्रमाणपत्र वाटत केली नाहीत. सरकारने आमच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केली.
सरकारने गुन्हे सरसकट मागे घेणार असे, सांगितले होते. पण त्यांनी अजून मागे घेतले नाहीत. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना अजून निधी सरकारने दिला नाही. अशा वेगवेगळ्या आठ ते नऊ मागण्या आम्ही सरकारकडे केलेल्या आहेत. जुन्याच मागण्या आम्ही नव्याने करत आहोत. यामध्ये नवीन काही नाही. यामुळे सरकारला आमची विनंती आहे की, या मागण्या लगेचच आणि तातडीने मान्य करा.