जालना- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि.२०) जालना येथे म्हटले.जालना येथे राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, गरजवंत महिलांसाठी राज्य शासनाने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. परंतु, इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे अडीच लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गरजवंत महिलांनाच यापुढे लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.
विरोधकांनी सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत, असा कांगावा केला होता. परंतु, आम्ही वचनपूर्ती करणारे आहोत. लाडक्या बहिणी योजनेसाठी तीन हजार ७०० कोटींचा धनादेश महिला व बाल कल्याण विभागाला दिला आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात झाले असून (दि.२६) जानेवारी पर्यंत बहिणींच्या खात्यावर पैसे पडतील. ज्यांचे उत्पन्न महिना २० ते २१ हजारांपेक्षा अधिक आहे, त्या महिलांनी स्वतःहून या योजनेच्या लाभाची गरज नाही, असे जाहीर केले पाहिजे,असे अजित पवार यांनी म्हटले.
दरम्यान पक्षप्रवेश देताना चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षात सामील करा. लोकांना फसवणाऱ्या व्यक्तींना पक्षात प्रवेश देऊ नका. पक्षात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम यापुढे सर्वांनीच करावे. पक्षांतर्गत कुरघोड्या थांबवाव्यात, असा सल्लाही या वेळी अजित पवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.