संकटं अनेकदा संधी घेऊन येतात.संघर्ष देखील अनेकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी देतो.कोणतही नेतृत्व केवळ पदांपुरतं नसतं,तर नेतृत्वाने समाजाला दिशा द्यायची असते,त्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो.आता ती संधी मंत्री पंकजा मुंडेंना मिळालेली आहे.महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारणाच एक संवेदनशील केंद्र ज्या जिल्ह्यात आहे आणि ज्या जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या समूहांची आंदोलने सुरु झाली, त्या जिल्ह्याचे पालकत्व निभावणे,ते देखील ज्या काळात राज्यभरातच सामाजिक दरी वाढली आहे, त्या काळात,सोपे नाही.मात्र पंकजा मुंडेंना ती संधी मिळाली आहे. गोपीनाथ मुंडेंची लेक असणं हे त्यांचं या वाटचालीतील मोठं बलस्थान असणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक वातावरणात मागच्या दोन वर्षात ज्या घटना घडल्या,ज्यामुळे सारा महाराष्ट्र ढवळून निघाला,त्या घटनांचे केंद्रस्थान जालना जिल्हा होता.राज्यात ज्याचा वणवा पोहचला ते मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणून राज्यभरात पेटलेले ओबीसी आंदोलन,या दोन्ही आंदोलनांची ठिणगी पेटली ती जालना जिल्ह्यात.या दोन्ही आंदोलनांमधील मागण्या,त्याचे राजकारण,त्याची वेगवेगळी राजकीय, सामाजिक अंग यावर आज याठिकाणी चर्चा करायची नाही,मात्र या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक वातावरण अस्वस्थ झालेले आहे. जालना जिल्ह्याचा शेजारी असलेला आणि मंत्री पंकजा मुंडेंचा स्वजिल्हा असलेला बीड तर या सामाजिक अस्वस्थतेच्या वणव्यात होरपळतो आहे.याची धग कमी-अधिक प्रमाणात राज्यात सगळीकडेच जाणवतेय.या साऱ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंकडे जालना जिल्ह्याचे पालकत्व आले आहे.
पंकजा मुंडेंकडे हे पालकत्व येण्यापूर्वीची त्यांची मागची पाच वर्ष देखील प्रचंड संघर्षाची,खूप काही पचविण्याची आणि त्यांच्या 'सबुरी' ची परीक्षा घेणारी ठरलेली आहेत.राजकारण, समाजकारण असेल किंवा व्यक्तिगत आयुष्य,अडचणी किंवा संकटं कधी एकटी येत नाहीत,तर त्यांचा गुंताच भल्याभल्यांना भांबावून टाकत असतो, त्या परिस्थितीत पाय रोवून उभे राहता आले तर खूप मोठे अनुभव पुढच्या आयुष्यातील शिदोरी म्हणून कामी येतात.पंकजा मुंडेंकडे आता ती शिदोरी मोठी असणार आहे.त्यामुळेच सामाजिक अस्वस्थेतेच्या कारणातून संवेदनशील झालेल्या जालना जिल्ह्याचे पालकत्व निभावणे पंकजा मुंडेंची एक संधी देखील असणार आहे.ती संधी असेल राजकीय इच्छाशक्ती असेल तर सामाजिक अस्वस्थेवर मात कशी करता येते ते दाखविण्याची. पालकत्वाची भावना आणि पालकत्वाची भूमिका कोणत्याही अस्वस्थतेपेक्षा मोठी असते हे राज्याला दाखवून देण्याची. हे असे सिद्ध करणे वाटते तितके सोपे नाही,राजकारणाच्या बुद्धिबळात तिरक्या चाळीचे उंटच अधिक वाढलेले असताना आणि प्रत्येक प्याद्याला काही घरे चालून पुन्हा असला तिरक्या चालीचा उंट होण्यातच समाधान वाटत असल्याच्या काळात हे आव्हान म्हणूनच अधिक अवघड आहे.
मात्र या आव्हानाला संधी करणे पंकजा मुंडेंना साधणारे आहे ते यासाठी की त्यांचे गोपीनाथ मुंडेंची लेक असणे हे फार मोठे बलस्थान आहे.जालना जिल्ह्याच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन ज्यांना राजकीय उंची मिळवून दिली अशांची संख्या मोठी आहे.मुळात दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे राजकारण कधी कोण एका जातीसाठी नव्हते आणि त्यांच्यावर तसा आरोप देखील कधी झाला नाही.म्हणूनच जाती धर्मापलीकडचा नेता अशी ओळख गोपीनाथ मुंडेंची होती.गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर राज्यभरात पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेला जो प्रतिसाद मिळाला होता,त्याला कारण देखील हेच होते.तोच वारसा पुढे नेत पंकजा मुंडेंची एकूण कारकीर्द राहिलेली आहे.२०१४- १९ या काळात त्या राज्यात मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री असताना,त्यांची सर्वसमावेशक भूमिका राज्यात चर्चेत होती,बीडच्या जनतेला ती भावली होती.त्यांच्या पालकमंत्रीपदाची कारकीर्द आजही आठविली जाते. अगदी काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जे सामाजिक वातावरण गढूळ झाले होते आणि ज्याचा फटका स्वतः पंकजा मुंडेंना बीडमध्ये बसला,त्यानंतरही पंकजा मुंडेंच्या सर्वसमावेशक भूमिकेत बदल झाला नाही.विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर अगोदर नारायणगडावर जाऊन त्यांनी त्यांच्यातील 'स्टेट्समन' चा परिचय करून दिला होता.म्हणूनच आता जालन्याचे पालकत्व निभावतांनाच,केवळ जालन्यातीलच नव्हे,त्यांच्या स्वतःच्या बीड जिल्ह्यातील आणि एकूणच राज्यभरातील सामाजिक अस्वस्थता संपविण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे.
पालकमंत्री म्हणजे केवळ नियोजन समितीचा निधी,किंवा वेगवेगळ्या शासकीय समित्यांवरील नियुक्त्या आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या इतक्यापुरताच मर्यादित नसतो,किंवा इतकेच पालकमंत्र्यांचे इतिकर्तव्य नसते,तर सामाजिक उत्थानामध्ये,सामाजिक सलोखा निर्माण करण्यात देखील पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते.ज्यावेळी देशभर मुस्लिम समाजामध्ये भाजपबद्दल भीतीचे वातावरण होते,त्यावेळी 'गोपीनाथ मुंडेंच्या भाजपात हम सेफ है'अशी भावना अल्पसंख्यांक समुदायाची होती.हा वारसा एकूणच सामाजिक सलोख्याच्या,जातीजातीत निर्माण झालेली दरी कमी करण्याच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडेंना सिद्ध करावा लागेल.एका अर्थाने पालकत्व खरोखर काय असते हे दाखवून देण्याची संधी पंकजा मुंडेंसमोर आहे.त्या संधीचे त्यांना सोने करता यावे हीच अपेक्षा.