Advertisement

 कोंडी फुटली पाहिजे , कामात राहा , लोकांमध्ये जा (धनंजय मुंडे (DM ) यांना अनावृत्त पत्र(Letter) )

प्रजापत्र | Friday, 17/01/2025
बातमी शेअर करा

मा. मंत्री महोदय धनंजयजी मुंडे ,
सस्नेह नमस्कार .
मागच्या एक दीड महिन्यापासून जिल्ह्यात जे काही सुरु आहे, त्यामुळे साऱ्याच वातावरणात अस्वस्थता आहे. संतोष देशमुख यांची झालेली हत्या निश्चितपणे प्रत्येकाची ह्रदय हेलावणारी होती, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही, आपणही तीच भूमिका घेतली. या हत्या प्रकरणातील जे कोणी दोषी असतील , त्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी. प्रत्येकाच्या मनातील ही भावना आहेच. आपल्याही मनातील भावना तीच आहे , आणि आपण तसे व्यक्त देखील झालात . मात्र त्यानंतर मागच्या महिनाभरात जे काही घडत आहे, ते सामान्य नागरिकांना , बीडकरांना अस्वस्थ करणारे आहे. राज्यभरात बीडची प्रतिमा फार वेगळी झाली आहे. बीडच्या (Beed)विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरात खोली मिळत नाही हे ऐकले होते आता तर बीडच्या प्रवाशांना लॉज देखील मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. बीडची प्रतिमा बिघडण्याला कोण जबाबदार, कोणाची चूक, कोण बरोबर या वादात पडायचे नाही , मात्र जे काही सुरु आहे ते अस्वस्थ करणारे आहे. जिल्ह्यात दोन समाजमधली दारी अधिकाधिक वाढत आहे. प्रत्येकाचा न्यायासाठीचा आक्रोश समजून घ्यावाच लागेल. न्याय मागण्याचा, तो मिळत नाही असे वाटल्यास आंदोलन करण्याचा अधिकार देखील प्रत्येकाला आहेच. त्यामुळे त्याबद्दलही काही बोलायचे नाही , मात्र जिल्ह्यातील वाढत्या सामाजिक अस्वस्थतेबद्दल (Social unrest)बोलावेच लागेल. या साऱ्या काळात आपले मौन म्हणूनच अधिकच अस्वस्थ कारणाने आहे.

आपण या जिल्ह्यातले एक मंत्रीआहात, माजी पालकमंत्री आहात म्हणून आपण अशावेळी काही तरी मोकळे बोलले पाहिजे. आपल्या शब्दावर अनेक ठिकाणचे वातावरण बदलू शकते, परिस्थिती निवळू शकते , अशावेळी आपण गप्प बसने, जनतेपासून दूर राहाणे जिल्ह्यासाठी फारसे चांगले नाही. बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकप्रतिनिधींकडे जनता नेहमीच पालकत्वाच्या भूमिकेतून पाहत आलेली आहे. त्यासाठी मग त्या लोकप्रतिनिधींकडे कोणते संवैधानिक पद आहे किंवा नाही , याची पर्वा कधी जनतेला वाटली नाही. दिवंगत सुंदरराव सोळंके असतील किंवा शिवाजीराव पंडित हे नेते काही प्रदीर्घकाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नव्हते पण जिल्ह्याने त्यांच्याकडे कायम पालकत्वाच्या भूमिकेतूनच पाहिले , कसोटीच्या क्षणी जनतेत जाऊन या नेत्यांनी त्या भूमिकेला न्याय देखील दिला. दिवंगत केशरकाकू क्षीरसागर या कधीच पालकमंत्री नव्हत्या किंवा मंत्री देखील नव्हत्या , मात्र कठीण काळात त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष असायचे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे तर सत्ता अत्यंत कमी काळ होती, मात्र त्यांच्या हयातीपर्यंत ते जिल्ह्याचे पालकच होते , त्यांनी अनेक प्रसंगांमधून ते दाखवून देखील दिले. हे सारे यासाठी सांगायचे की आपण या सर्वांचे राजकारण जवळून पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. यातील अनेकांच्या राजकारणाचा , समाजकारणाचा आपल्यावर प्रभाव आहे. मग अशा कसोटीच्यावेळी आपले मौन असणे न पचणारे आहे.
संतोष देशमुख ( Santosh Deshmukh )यांच्या हत्या प्रकरणातील दोषींचे जे काही करायचे असेल ते न्यायव्यवस्था करेल, मात्र आज ज्या सामाजिक अस्वस्थेतून बीड जिल्हा जात आहे, ती कोंडी कोणी फोडायची ? यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे, या प्रकरणात आपल्याला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असेलही, पण म्हणून आपण बोलायचेच नाही, लोकांमध्ये जायचेच नाही असे म्हणून कसे चालेल ? त्यामुळे सामाजिक अस्वस्थता अधिकच वाढेल . लोकप्रतिनिधी कधीच कोणत्याही एका समूहाचा नसतो, तो साऱ्या समाजाचा असतो. त्यामुळे सामाजिक अस्वस्थतेच्या काळात ही दरी मिटविण्यासाठी आपण पुढे यायला हवे. लोकांमध्ये जायला हवे, आपल्या मनातील बोलायला हवे. आरोप, प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन जनतेच्या भावना समजून घ्यायला हव्यात . मागच्या महिनाभरापासून जिल्ह्यातील बहुतांश कामकाज ठप्प पडल्यासारखे चित्र आहे, लोकांचे अनेक प्रश्न आहेत, मंत्री म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना त्याचे समाधान व्हावे म्हणून आपल्याशी भेटायचे असते, बोलायचे असते, पण आपण स्वतःच स्वतःला स्वतःपासून  दूर केले आहे.काळ आपण लोकांच्या तक्रारी ऐकायला सुरुवात केली, त्याचे स्वागत , पण इतक्याने भागणार नाही. जिल्ह्यातील सामाजिक अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण अधिकाधिक लोकांमध्ये गेले पाहिजे,  आपली एक भूमिका, आपली सर्व कार्यकर्त्यांशी झालेली एक चर्चा जिल्ह्यातले सामाजिक वातावरण पुन्हा नितळ करू शकते. हत्या प्रकरणाचा, खंडणी प्रकरणाचा, जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि साऱ्याच घटनांचा तपास, चौकशी होत राहील, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था त्यात करायचे ते करील, सत्ता, पदे आणि राजकारण देखील होत राहील,  पण सामाजिक अस्वस्थता दूर करण्याची जबादारी आपल्याला पार पाडावी लागेल. कामात राहावे लागेल, जनतेत जावे लागेल , लोकांना बोलावे लागेल. पालकत्वाच्या, नेत्याच्या, भावाच्या भूमिकेतून तुम्हाला जनतेत जावे लागेल. एकदा जे काही मनात आहे ते बोलून मोकळे व्हावे लागेल. त्याशिवाय कोंडी फुटणार नाही. आणि कोंडी फुटली नाही नाही तर जिल्ह्याच्या सामाजिक सलोख्याला झालेली जखम अधिकच ठसठसत राहील. ते होऊ देऊ नका, लोकांना आपल्या बोलण्याची, आपल्या भूमिकेची प्रतीक्षा आहे.
आपलाच
एक बीडकर .

Advertisement

Advertisement