चाकण - शिक्रापूर राज्य महामार्गांवर एका मद्यधुंद माथेफिरू कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहतुकीचे नियम तोडून रस्त्यावरील इतर सुमारे २५ ते ३० वाहनांना उडवले आहे. विशेष म्हणजे संबंधित कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही धडक देण्यात आली आहे. अक्षरशः चित्रपटात शोभावा असा भयानक थरार प्रत्यक्षदर्शीना अनुभवला. अखेर स्थानिक तरुण व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित कंटेनर अडविण्यात यश आले आहे. मद्यधुंद माथेफिरू चालकाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान या अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
चाकण (pune) शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी (दि. १६) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. माथेफिरू चालक हा चाकणहून शिक्रापूर बाजूकडे अवजड कंटेनर घेऊन जात होता. मात्र त्या कंटेनरचा वेग खूप होता. रस्त्यावर कंटेनर समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक देऊन तो भरधाव वेगाने पुढे निघून जात होता. चाकणपासून पिंपळे - जगताप हद्दीपर्यंत सुमारे २५ ते ३० वाहनांना कंटेनर (accident)धडक दिली आहे. चौफुला परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनाला पाठीमागून धडक दिली. तर अन्य एका स्विफ्ट कारला धडक दिली आहे. बहुतांश अपघात सिसिटीव्हीत कैद झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या कंटेनरचा शेलपिंपळगाव हद्दीपासून रस्त्यावरील सुमारे ३० ते ४० दुचाकीस्वार तरुणांकडून पाठलाग सुरु होता. मात्र कंटेनरचा चालक सुसाट वेगाने कंटेनर पळवत असल्याने तो अडविण्यात अडथळा येत होता. कंटेनर समोर जाणे धोक्याचे होते. दरम्यान एका (pune police)पोलिसांच्या गाडीलाही या कंटेनरने धडक दिली. अखेर तासाभरच्या प्रयत्नांनंतर जातेगाव हद्दीत संबंधित कंटेनर पकडण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.