नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) सायंकाळी साडेसात- रात्री आठच्या सुमारास पुढे चाललेल्या सळईच्या ट्रकमध्ये मागून भरधाव आलेला टेम्पो थेट घुसला. पुढच्या ट्रकमधील बाहेर असलेल्या सळई घुसून पाच जण जागीच ठार झाले तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. धुळ्याकडून नाशिकमध्ये उतरणाऱ्या रॅम्पच्या पुढे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी पाथर्डी फाटा, सह्याद्रीनगर (सिडको) येथील आहेत.
वनगाव (धारणगाव-वीर, ता. निफाड) येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून येत असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की टेम्पोमधील तरुणाच्या डोक्यात सळई आरपार घुसली होती. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरारी झाला.
अतुल मंडलिक, चेतन पवार, दर्शन घरत, यश खरात, संतोष मंडलिक अशी मृत तरुणांची नावे आहेत. जखमींमध्ये प्रेम मोरे, सार्थक ऊर्फ लकी सोनवणे, राहुल साबळे, लोकेश (पूर्ण नाव समजू शकले नाही), विद्यानंद कांबळे, समीर गवई, अरमान खान, अनुज घरटे, साई काळे, मकरंद आहेर, कृष्णा भगत, शुभम डंगरे, अभिषेक आदी १४ जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर खासगी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
असा झाला अपघात
अपघातग्रस्त तरुण वनगाव (धारणगाव-वीर, ता. निफाड) येथे म्हसोबा देवस्थानी आयोजित कारणाच्या (देवाचा) कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते निफाडमार्गे महामागनि नांदूर नाक्यावरून जत्रा हॉटेलकडे आणि तेथून महामार्गावरून उड्डाणपुलावर चढले. आयशर ट्रकचा वेग कमी करताना ट्रकचालकाने ब्रेक मारल्याने मागून भरधाव असलेला टेम्पो ओव्हरटेकच्या नादात ट्रकमधील सळईंवर जाऊन आदळल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली.