मुंबई- गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, त्यापेक्षा बाळासाहेबांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे, असे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच आता २०२६ मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनावेळी जे सरकार असेल त्याचे ते श्रेय असेल. त्यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांना आमंत्रित करू. तसेच एनडीए शिल्लक राहिली तर त्यांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही
पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे ते म्हणाले. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचे स्मारक कोण बांधत आहे? सरकार बांधत आहे. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. जून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली? सरडे रंग बदलतात. पण एवढे वेगाने रंग बदलणारे सरडे पाहिले नाहीत, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला.