नगर - राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळत सत्ता काबीज केली आहे. महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. तर भाजपने 133 जागा जिकंत आपण येथील प्रमुख आणि मोठा राजकीय पक्ष असल्याचे दाखवून दिले. यानंतर आता राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असून भाजप तयारीला लागली आहे. विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपने शिर्डी येथे महाअधिवेशन भरवले आहे. या अधिवेशनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना खेड्याकडे चलोचा नारा दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने साईंच्या शिर्डीत महाअधिवेशन घेतलं आहे. या महाअधिवेशनाला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यभरातून आलेल्या सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी यांना कानमंत्र दिला. यावेळी बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून एकदा खेड्यात मुक्काम करावा, अशा सूचना केल्या आहेत.