मुंबई- संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकांबाबत बोलताना म्हटले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचे आहेच. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजींनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. असे आमचे ठरते आहे. मुंबई असेल, ठाणे, पुणे, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावं.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंडिया आघाडी अजूनही मजबूत आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला कुठेही धक्का नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, संजय राऊतांची भूमिका नेते मोठे आहेत. त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. तरीपण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करु आणि त्यांना विनंती करु की, आपण एकत्र लढूया. नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.