बीड दि.११ (प्रतिनिधी)- (Beed police)पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांसह शस्त्र बाळगून दहशत पसरविणाऱ्या विरूध्द कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने आज (दि.११) पहाटे गेवराईतील म्हाडा कॉलनी परिसरात (pune)पुण्यातील कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपी गोरख सातपूते (बप्पा) आणि त्याचा साथीदार तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे या दोघांना मोठ्या शिताफीने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडून कोयता, तलवार, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेला रिक्षा जप्त करण्यात आला.
अधिक माहिती अशी कि, (Beed police)पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक (Lcb) गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढून कारवाईच्या सुचना आपल्या टीमला दिल्या आहेत. (दि.१०) रोजी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सिध्देश्वर मुरकूटे हे पथकासह गेवराई उपविभागात पेट्रोलिंग करत असतांना पो.ना.विकास बाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम रिक्षामधुन अवैध शस्त्र घेऊन जात असल्याचे समजताच पोलीसांनी सापळा लावून म्हाडा कॉलनी जवळील रस्त्यावर रिक्षा अडवला. त्यावेळी पथकाला पाहुन आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलीसांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी पोलीसांनी गोरख सातपुते (वय २९ रा. काळेवाडी फाटा थेरगाव जि. पुणे) आणि तात्याराव उर्फ विजय पहाडे (वय २८ रा.राहटी फाटा अमरदिप कॉलनी पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक कोयता, तलवार,चाकू व गुन्ह्यात वापरलेला रिक्षा असा एकूण १ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सहाय्यक फौजदार परशुराम जगताप यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरूध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूते आणि पहाडे हे दोघेही (Pune)पुणे येथील कोयता गॅगचे सदस्य असुन
काळेवाडी (पिंपरी चिंचवड) पोलीस ठाण्यात दाखल हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये ते फरार आरोपी आहेत. दोन्ही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेवराई पोलीसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे, सहा.फौ.तुळशीराम जगताप,पो. ह. कैलास ठोंबरे, मनोज बाघ,विष्णू सानप,राहुल शिंदे, पो.ना.विकास वाघमारे व चालक सुनिल राठोड यांनी केली.