नगर - पतंग उडवित असताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलगी विहिरीत पडली. या घटनेत मुलीचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. दरम्यान, मृत बालिकेचे नाव बिनीता बिष्णू थापा असे असून, ती इयत्ता ५ वीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती समजली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नेपाळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले थापा कुटुंबिय मानोरी (ता. राहुरी) येथे रहायला आलेले आहे. पत्नी, दोन मुले व दोन मुली असे कुटुंबिय असलेले बिष्णू थापा हे हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. दरम्यान काल मोठी मुलगी बिनीता हीने पतंगासाठी वडिलांकडे हट्ट धरला. अखेरीस मुलीचा हट्ट पूर्ण करीत बिष्णू थापा यांनी मुलीला सकाळी पतंग आणून दिला.
सकाळी 8.30 वाजता ती आपल्या मित्रांसमवेत पतंग उडविण्यासाठी गेली असता घरालगत असलेल्या एका विहीरीत पडल्याचे कुटुंबियांना समजले. कुटुंबियांसह मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर पाणबुडे सर्जराव जाधव, तुषार बाचकर यांनी विहीरीत उडी घेत मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही काळाने मुलीचा शोध घेतल्यानंतर बिनीता हिस दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आले. सचिन गुंजाळ व सचिन धसाळ या रुग्णवाहिका चालकांनी तत्काळ दाखल होत तिला राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयात आणले. परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने मानोरी परिसरात शोककळा पसरली होती.