Advertisement

बीड दि.१० (प्रतिनिधी): जिल्हापरिषदच्या शिक्षण विभागात पेन्शनची फाईल पुढे पाठविण्यासाठी लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हापरिषदेतील खाबुगिरी चर्चेत आली आहे. पेन्शनच्या फाईलसाठी लाच घेणे हे तर  हिमनगाचे केवळ वरचे टोक आहे. मुळातच बीडच्या जिल्हा परिषदेत  केवळ शिक्षणच नाही तर बहुतांश विभागातील बहुतांश टेबल खाबुगिरी आणि लाचखोरीच्या घुशींनी पोखरले आहेत. अगदी काही विभागात तर अधिकार्‍यांनीच आपले दलाल गावा गावात सोडल्याच्या चर्चा यापूर्वी देखील झाल्याच होत्या. त्यामुळे आता या बजबजपुरीवर कारवाई करण्याची हिंमत थेट आयएएस असलेले सीईओ दाखविणार का? हा सामान्यांना पडलेला प्रश्‍न आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये लाचखोरी हा तसा नवीन विषय नाही, मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या या खात्यात छोट्या मोठ्या कामासाठी हात ओले करावेच लागतात. बांधकाम, पाटबंधारे, एफडी, समाजकल्याण आदी विभागात तर पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही आणि पैसे दिले की काहीच अडत नाही हे जिल्ह्याला नवीन नाही. त्यामुळे पेन्शनची फाईल पुढे सरकविण्यासाठी लाच मागतानाचे समोर आलेले प्रकरण केवळ हिमनगाचे टोक आहे. 
बीडच्या जिल्हा परिषदेत बांधकाम, समाजकल्याण, जलजीवन, स्वच्छता आदी बहुतांश खात्यात मागच्या काळात खाबुगिरी वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आल्यापासून तर या खाबुगिरीची विचारणा करणारेही कोणी नाही. मध्यंतरी दलीत  वस्तीच्या निधी वाटपाच्या वेळी काही अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेचेच कर्मचारी असलेल्या काही व्यक्तींना थेट गावात सरपंचांसोबत टक्केवारीची चर्चा करण्यासाठी दलाल म्हणून पाठविल्याची चर्चा सुरू होती. ग्रामीण भागात पुर्वी सकाळी सकाळी ‘वासूदेव’ दान पावलं म्हणत घरोघरी भेटी द्यायचा तसे एका  अधिकार्‍याच्या सूचनेवरून काही कर्मचारी सरपंच, ग्रामसेवकांना गळाला लावत ‘दान’ पावतयं का? या भुमिकेत होते. जलजीवनच्या बाबतीतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. केवळ कागदावरच झालेल्या प्रशिक्षणाची कोट्यावधींची बिले थोडे हात ओले केले की बिनबोभाट निघतात हे आतापर्यंत अनुभवायला आले आहे. 
सविस्तर लिहायचे म्हटले तर खुप वर्षापूर्वी आलेल्या झेडपी चित्रपटाला लाजविल असे प्रकार सध्या बीडच्या जिल्हा परिषदेत सुरू आहेत. अधिकारी राज असल्यामुळे कोणी कोणाला गिनायला तयार नााही. या बजबजपुरीला रोखण्याचे आव्हान थेट आयएएस असलेले आदित्य जीवने कसे पेलणार हा मोठा विषय आहे.

 

 

 

सीईओंच्या नावाचाही गैरवापर
बीड जिल्ह्यात आदित्य जीवने यांची कामगिरी तशी चमकदार राहिली होती. परिविक्षा कालावधीत ते गेवराई पंचायत समितीत  तसेच माजलगाव नगर पालिकेत प्रभारी अधिकारी म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांच्या कामाचा एक वेगळा ठसा उमटला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेतही ते काहीतरी वेगळे करतील अशी अपेक्षा अजूनही लोकांना आहे. मात्र मागच्या काही काळात त्यांचेच अधिकारी कार्यकर्त्यांना बोलतांना ‘आमचे काही नाही हो, पण सीईओ साहेबच सही करत नाहीत’ असे सांगू लागले आहेत. यामुळे सीईओंच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसत आहे. या सार्‍या प्रकाराची माहिती सीईओंनी स्वत:च्या यंत्रणेतून घ्यावी आणि आपण खरोखर विनाकारण आडवाअडवी करत नाही हे दाखवून द्यावे हे अपेक्षित आहे. 

Advertisement

Advertisement