बीड: विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या राजेंद्र मस्के यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राजेंद्र मस्के यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीडच्या राजकारणात राजेंद्र मस्के दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक दिवस भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर भाजपमध्ये ते अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बीड विधानसभा मतथारसंघाच्या निवडणूकीत त्यांनी आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला होता. आता त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पक्षाची मुंबई येथे आज बैठक झाली. त्यानंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रजापत्र | Thursday, 09/01/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा