पन्हाळा : मर्जीविरोधात भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाने भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहचविण्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथे घडला. याप्रकरणी मामा महेश जोतीराम पाटील (रा. उत्रे, ता. पन्हाळा) याच्या विरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाची लहानपणापासून महेश पाटील यांच्याकडे उत्रे येथे राहायला होती. उत्रे गावातीलच एका तरूणाशी तिचे प्रेमसुत जुळले. मामाचा या लग्नाला विरोध असल्याने भाचीने आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर उत्रे गावात नवरदेवाच्या कुटुंबीयांकडून फटाक्यांची आतषबाजी झाल्याने मामाच्या संतापात भर पडली होती. मंगळवारी (दि. 7) सकाळी सव्वा अकरा वाजता उत्रे येथील गुरुदेव सांस्कृतिक कार्यालयात प्रशांत पाटील यांच्या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवरी मुलीचा मामा महेश पाटील याने प्लास्टिकच्या बाटलीतून विषारी औषध जेवणामध्ये मिसळले. जेवणात विषारी औषध टाकताना मामा आणि आचाऱ्याची झटापट झाली. आचाऱ्याच्या समोरच जेवणामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
याप्रकरणी संजय गोविंद पाटील (वय 51, रा. उत्रे) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी महेश जोतीराम पाटील फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. या संशयित आरोपीवर लोकांच्या जीवितास धोका पोहोचवणे उद्देशाने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.