Advertisement

संपादकीय अग्रलेख- घडवावा लागेल एकोपा    

प्रजापत्र | Tuesday, 07/01/2025
बातमी शेअर करा

    संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात आणि राज्यभरात जी काही आरोप प्रत्यारोपाची राळ उडली आहे त्याचे दिर्घकालिन परिणाम होणार आहेत. आजच्या तारखेला बीड जिल्ह्याची प्रतिमा राज्यभरात पुरती खराब झालेली आहेच मात्र त्यासोबतच बीड जिल्ह्यात लोकसंख्येने मोठे असणार्‍या दोन समाजांमधील दरीसद्धा प्रचंड वाढली आहे. अगदी दोन समाज एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहतात अशी निर्माण झालेली परिस्थिती सर्वांसाठीच घात आहे.  

     बीड जिल्ह्याची सामाजिक रचना पाहता या जिल्ह्यात मराठा आणि वंजारा या जातीसमुहाचे वर्चस्व पहिल्यापासून राहिलेले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येत या दोन्ही जाती मोठ्या संख्येने आहेत. किंबहूना पहिल्या दोन क्रमांकावर या दोन जाती समुहांची लोकसंख्या आहे. कोणी कितीही नाकारले तरी अजूनही जात हे आपल्या समाज व्यवस्थेचे कटू वास्तव आहे. त्यामुळे आज जातींचा उल्लेख करून काही लिहीणे आवश्यक झाले आहे. बीड जिल्ह्यात संख्येने मोठे असणार्‍या या दोन्ही जातींमध्ये नेत्यांचे परस्पर राजकीय विरोध सोडले तर तशी शत्रूत्वाची भावना फारशी कधी निर्माण झालेली नव्हती. अनेक प्रसंगात हे दोन्ही समूदाय गुण्यागोविंदाने राहतात हेच चित्र होते. राजकारणापूरते किंवा एखाद्या परिसरातील तात्कालिक घटनेवरून दोन समाज कधी समोरासमोर आल्याचे दिसले तरी हा वाद दिर्घकाळ राहिला नव्हता. अशा बीड जिल्ह्यात मागच्या काही काळात सातत्याने मराठा-वंजारा वाद पेटविण्याचा प्रकार सुरू आहे. 
कोणताही समाज सामान्यतः इतरांचा द्वेष करणारा नसतो. बहूसंख्य समाजमन सर्वांना सोबत घेवून चालणारे असते त्यातही समाजातील ज्या घटकांचे हातावर पोट असते त्यांना तर जातीच्या किंवा इतर कोणत्या कारणाखाली निर्माण झालेली विखार ना परवडणारा असतो ना पचणारा असतो. मराठा-वंजारा समूदायाच्या संदर्भाने देखील तेच सुत्र लागू होते. मात्र मागच्या काही काळात बहूसंख्य समाज मनाच्या या भावनेवर राजकीय अस्मितांनी काहीशी मात केल्याचे चित्र आहे. राजकीय नेतृत्व कोणाचे असावे या मुळ कारणातून मागच्या काही वर्षात मराठा विरूद्ध वंजारा असे चित्र अनेकदा तयार केले जात आहे. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडे सक्रीय असताना देखील त्यांच्या रेणापूर मतदार संघातील निवडणुकीत ‘वाजवा तूतारी’ ही घोषणा आली होतीच ती पून्हा त्यांच्या 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही आली मात्र हे राजकीय चित्र असले तरी त्याचा परिणाम कधी निवडणुकीनंतरच्या समाजमनावर झाला नव्हता. आता मात्र सारेच चित्र बदलले आहे.
संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही क्रुर आणि अमानवी म्हणावी अशी आहे आणि त्याचा निषेधच झाला पाहीजे ही भूमिका प्रजापत्रने वारंवार घेतलेली आहेच. सामान्य समाजमनाची देखील तिच भावना आहे पण त्यासोबतच या हत्येला जातीय किनार नव्हती हे देखील वास्तव आहे आणि समाजात ते अधिक तीव्रपणे घेवून जाण्याची गरज आहे. मयत आणि आरोपी हे वेगवेगळ्या जातीमधील आहे केवळ इतक्या कारणामुळे या प्रकरणाला जातीय रंग दिला जाणे अपेक्षीत नाही मात्र मागच्या काही काळात या प्रकरणावरून ज्या पद्धतीने राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जातीय सलोखा बिघडला आहे. दोन समाज एकमेकांकडे शत्रूत्वाच्या भावनेतून पाहत आहे. विशेष म्हणजे यातून संत आणि महापुरूष देखील सुटायला तयार नाहीत. कोणीही उठावे आणि काहीही बोलावे, अगदी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले शिक्षक देखील कुठल्यातरी पोस्टसाठी आरोपी होत असतील तर प्रकरण किती चिघळले आहे हे लक्षात येवू शकते. कोणी घरात घुसून मारायची भाषा करतो तर कोणी बाप तो बाप रहेंगा म्हणत सोशल मीडियावर मिरवतो हे सारेच अराजकाकडे जाणारे आहे. यामुळे समाजाचे कधीच भरून न होणारे नुकसान झालेले आहे. आजच्या प्रसंगात कोण चुकीचे यावर भाष्य करण्याचे काहीच कारण नाही. मात्र काय चुकत आहे यावर तरी विचार करणे गरजेचे आहे. सामाजिक सलोखा हा या मातीचा गुण आहे, नगदनारायण महाराजांपासूनची संत परंपरा असेल, बंकटस्वामी महाराज असतील, भगवानबाबा, वामनभाऊ असतील या सार्‍या संतांच्या विचारांनी पोसलेल्या या भूमीत जातीय विद्वेषाची विषवल्ली फोफावून चालणार नाहीया विषवल्लीने सार्‍याच समाजाचा गळा घोटण्यापूर्वी आता दोन्ही समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील धुरीनांनी यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, समोर यावे लागेल, एकत्र बसावे लागेल. समाजातली ही दुही पुढच्या पिढीसाठी तर दुरच आजच्या पिढीसाठी घातक आहे. दोन्ही बाजूची तरूणाई कुठल्या तरी उन्मादाद स्वतःचे नुकसान करून घेण्याअगोदर सामाजिक एकोपा निर्माण करावा लागेल. तिच आजची आपल्या समोरची सर्वात मोठी गरज आहे.

 

Advertisement

Advertisement