Advertisement

 धनंजय मुंडेंवर आरोप अन् राजीनाम्याची होतेय मागणी

प्रजापत्र | Monday, 06/01/2025
बातमी शेअर करा

 मुंबई- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आलीय. वाल्मीक कराडचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचं म्हणत विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी होतेय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा, जो पर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं भुजबळ म्हणाले.

 

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर भुजबळ मंत्रिमंडळात येतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. यावर भुजबळ म्हणाले की, मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा बळी घ्यावा असं माझ्या स्वप्नातही नाही. मी ऐकतोय धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, मला सांगायचंय की फडणवीसांनी स्पष्ट केलंय की चौकशी केल्यावर जे दोषी सापडतील, आका , काका जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करू. त्याआधी आपण राजीनामा का मागतोय? तुमच्याकडे मागणी असेल तर पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील. कारण नसताना राजीनामा घेणं योग्य नाही. नेते मंत्री होतात ते लहानपणापासून काम करत करत मोठे झालेले असतात. चौकशीत सापडले तर मुख्यमंत्री काय ते सांगतील.

Advertisement

Advertisement