मुंबई : गेल्या वर्षी सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणा सरकारने केली. महायुती सरकारला या योजनेचा फायदाही झाली. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. मात्र, आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार या योजनेसाठी निकष लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.या मुद्यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनीही निकषाच्या मुद्द्यावरून सरकारला सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेनुसार महिलांना पैसे दिले. दिव्यांगांना मानधन सुरु करायला यांना सहा महिने लागतात. पण लाडक्या बहिणींना अॅडव्हास पैसे देण्यात आले. लाखो महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसा टाकण्यात आले. सरकारी तिजोरीतून हात ओले करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आता सरकारने माघार घेऊ नये. लाडक्या बहिणींसाठी निकष न ठेवता ज्या महिलांना पैसे दिले जात आहेत, त्यांना नियमित पैसे द्यावे, असं बच्चू कडू म्हणाले.
पुढे बोलताना, जर सरकारने आता निकष लावण्याचा प्रयत्न केला, तर आधी सरकारची चौकशी करावी लागेल. पैसे देण्यापूर्वी सरकारने याचा विचार करायला हवा होता. आता निकष लावत आहेत, याचा अर्थ त्यावेळी सरकारचा हेतू काय होता हे तपासावं लागेल. जर निकषच लावायचे असतील, तर आधी आमदार खासदारांसाठी लावले पाहिजे, जे आमदार खासदार करोडपती आहेत. त्यांच्या पेन्शनबाबत निकष लावले पाहिजे, असं म्हणत त्यांनी सरकारलाही सुनावलं.
आज गोरगरीब मजुरांना पैसे मिळत नाही. त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना दिले जात नाही. घरी बसलेल्यांना पैसे देणाऱ्या योजना या केवळ राजकीय हेतूने सुरु केल्या जातात. लाडकी बहीण सुरु ठेवा, पण त्याबरोबर विधवा बहिणींचं काय, त्यांना संजय गांधी निरोधार योजनेचे पैसे मिळतात, म्हणून त्यांना तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे देत नाही. जे दिव्यांग आहेत, त्यांना पैसे दिले जात नाही. केवळ मतांसाठी ही योजना सुरु केली. अशा योजना देशासाठी धोकादायक ठरतात, अशी प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी दिली.