मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू झालेल्या चर्चांवर भाष्य करताना आम्ही आमचा मार्ग निवडला आहे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीसोबत आहे. या भूमिकेवर आम्ही ठाम असून, त्यात कोणताही बदल होणार नाही, असे सांगत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकत्र यायचे असेल तर शरद पवार गटाला निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अप्रत्यक्षरीत्या दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी नुकतेच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पवार कुटुंब एक व्हावे, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले की, ते नैसर्गिक आहे, हा कुटुंबाने एकत्र येण्याचा भाग झाला, अनेकदा कुटुंब आणि राजकारण वेगळे असू शकते.
छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी तटकरे म्हणाले, भुजबळ हे गेले काही दिवस परदेश दौऱ्यावर होते. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार आहे. येत्या दोन दिवसांत पालकमंत्री घोषित होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
१८ व १९ जानेवारी रोजी चिंतन शिबिर
अजित पवार गटाचे दोनदिवसीय शिबिर १८ व १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तसेच विविध फ्रंटल, सेलचे २५० ते ३०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.