मुंबई- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे. सावित्रीबाई फुले यांचं पुण्यातील भिडे वाडा येथील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या स्मारकासाठी विनंती करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात आज एक्सवर पोस्ट केली आहे.
“भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते, आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरु केली. त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील, स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. पण सावित्रीबाईंना प्रचंड अवहेलना, आणि उपहास सहन करावा लागला. आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की एखाद्या उद्योगसमूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाईंमुळेच शक्य झाला हे नक्की”, असं म्हणत राज ठाकरेंनी सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस अभिवादन केले.
लाडकी बहीण योजनेवर टोला
ते पुढे म्हणाले, “सरकारने कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय. असो, असं धरसोडपण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये”, असंही ते म्हणाले.