Advertisement

शरद पवार-अजितदादा एकत्र आले पाहिजेत

प्रजापत्र | Wednesday, 01/01/2025
बातमी शेअर करा

 मुंबई- विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश आणि बहुमत मिळाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रीपदावरून सारे काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीमधील काही मंत्र्यांनी अद्यापपर्यंत मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारलेला नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून हे मंत्री नाराज आहेत का, अशा चर्चाही रंगल्या आहेत. यातच अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार दिलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर बोलताना नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र यावेत, अशी इच्छा बोलून दाखवली.

 

 

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, संपूर्ण देशात पवार कुटुंबाचे वलय खूप मोठे आहे. त्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळे प्रत्येकाला वाटते की, शरद पवारांनी गंभीर आजार असतानाही आपल्यासाठी, समाजासाठी इतकी वर्ष काम करत आहेत. अजित पवार किती कामाचे आहेत, ते फक्त महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देश मान्य करतो. शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, दोघांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोक विनंती करत असतात. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत. ज्या दिवसापासून अजित पवारांसोबत आलो आहे, तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार यांच्यासमोरच गेलेलो नाही. परंतु, आता शरद पवार यांची भेट घेणार, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. 

 

 

पाडुंरंगाच्या शेजारी शरद पवार साहेबांना पाहतो

शरद पवार यांना सांगणार की, जनता आपल्याला दैवत मानते. पण राजकारणातील घडामोडींमुळे शरद पवार यांना सोडून आलो. त्यामुळे मी नर्व्हस झालो आहे. आता कोणत्या तोंडाने साहेबांसमोर जायचे, अशी अनेकांची अवस्था झालेली आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की, आता एकत्र या, असे झिरवाळ म्हणाले. तसेच दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे, ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील, असे झिरवाळ यांनी सांगितले.

दरम्यान, आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचे अवघड झाले आहे. याचा ते विचार करतीलच ना, असा विश्वास झिरवाळ यांनी व्यक्त केला. माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करत आहे, विरोधक असो किंवा राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना वाटते की, अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही शरद पवार यांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिले, असे झिरवाळ यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement