ठाणे : ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे माजी राज्यसभा खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी दुपारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ होते. त्यांच्या पश्चात मुलगा कमलेश, सून मानसी, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलेल्या शिवसैनिकांपैकी जुना - शिवसैनिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
१९७४-८१ या कार्यकाळात ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान यांनी काम पाहिले. शहरात शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर १९८६-८७ या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषविले. यासोबत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. यासोबतच शहरातील विविध क्रीडा संस्थांचे प्रमुख म्हणून प्रधान यांनी काम पाहिले.ठाण्यातील मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी सतीश प्रधान यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी दहा वाजता ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.