धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी)- तुमचाही बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करु अशी धमकी राज्याचे माजी आरोग्यमंत्री परंडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे.
(दि.२२) डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता मुळेवाडी पाटी येथे अज्ञात इसमाने तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे (राहणार पुसद) याकडे खाकी रंगाचे पॅकेट दिले. या पॅकेटमध्ये पांढऱ्या कागदावर पेन्सिलने धनंजय सावंत केशव सावंत यांना तुमचा 'मस्साजोग संतोष देशमुख करू' असा मजकूर लिहिला होता. तसेच यामध्ये एक शंभराची नोट देखील होती.धनंजय सावंत हे जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष तर केशव सावंत हे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. हे दोघेही धाराशिव कळंब मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात असतात यावेळी या दोघांची नावे या मतदारसंघातुन इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत होती.तीन महिन्यापूर्वी (दि.१३) सप्टेंबर रोजी धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरावर रात्री १२ वाजता अज्ञाताने गोळीबार केला होता.त्याचा तपास सुरू आहे आणि आता पत्राद्वारे धमकी दिल्याने परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान या प्रकरणी संजय बाबुराव निपाणीकर यांनी ढोकी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे अधिक तपास करत आहेत.