मुंबई- मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. ओबीसीचा मोठा चेहरा असूनही राज्य मंत्रिमंडळात भुजबळांना डावलण्यात आलं. त्यामुळे भुजबळांनी जाहीर पणे नाराजी व्यक्त केली. तरीही पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही दखल न घेतली घेल्याने छगन भुजबळ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहे. ते सागर बंगल्यावर दाखल झाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भुजबळ काय निर्णय घेता याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
ऐनथंडीच्या मोसमात छगन भुजबळांमुळे नाशिकचं राजकारण चांगलच तापलं आहे. भुजबळांनी नाराजीनंतर “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य केलं होतं. यामुळे छगन भुजबळ वेगळी वाट धरणार असल्याची चर्चा आहे. भुजबळांकडे तीन पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यात पहिला पर्याय शरद पवार गटात पुन्हा जाणे, दुसरा भाजपमध्ये प्रवेश करणे तर तिसरा पर्याय स्वत:चे ओबीसी संघटन करणे होय.
मात्र, नाशिकमधील मेळाव्यात भुजबळांनी आपण घाई न करता निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चेला त्यांनी एकप्रकारे पूर्णविराम दिला होता. मात्र, आज अशातच भुजबळ अजित पवार, सुनिल तटकरे यांना न भेटता थेट फडणवीसांच्या भेटीला गेल्याने खळबळ उडाली आहे.