नागपूर- विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडत आहे. या मंत्रिमंडळात अनेक नवनिर्वाचित चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने मंत्र्यांची नावे अधिकृतरित्या जाहीर केलेली नाहीत. मात्र, तरी काही आमदारांनी त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आल्याचं सांगितलं.
महायुतीत आता भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला किती मंत्रिपदे मिळतात? आणि कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळते? हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे. मात्र, काही मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. “काहींना अडीच-अडीच वर्षांसाठी संधी द्यायची असं ठरलं आहे, मग त्यामध्ये अनेक मंत्री आणि राज्यमंत्री सामावून घेतले जातील”, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरमधील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केलं आहे.