नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद येथे दारूबंदीसाठी २०१२ पासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र दारूबंदी झालीच नाही. अखेर आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात झाली. यावेळी गावातील १२६० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. दारूमुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांनी सुरू केलेल्या लढ्याला यश येणार का? हे आठ डिसेंबर रोजी सायंकाळी मतमोजणी नंतर कळणार आहे.
शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज ८ डिसेंबर रोजी गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर महिलांचे मतदानात सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली व उभी वाटली हे चिन्ह आहेत. गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून १२६० महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती तहसीलदार गिरासे यांनी दिली.
गावात दारूबंदीच्या मागणीसाठी गावकरी अनेक वर्षापासून लढा देत आहेत. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे. तर गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी महिला एकटवल्या. सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने मागणी मंजूर केली व मतदान घेण्यात येत आहे.