सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर फेरमतदान घेणाऱ्या मारकडवाडी गावामध्ये शरद पवार यांनी भेट दिली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मारकडवाडी गावामध्ये शरद पवारांनी ग्रामस्थांनी बोलून सर्व परस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आपल्या भाषणामधून त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्यावर निशाण साधला. तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा. आम्हाला EVM ने मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू, असा शब्द पवारांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांना दिला आहे.
अमेरिका, इंग्लंडसह युरोपमधील सगळे देश बॅलेट पेपरवर मतदान घेतात. अनेक देशांनी सुरू असलेलं EVM बंद केलं. त्यामुळे इथल्याही सर्व अडचणींवर एकच पर्याय असून, निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. तुम्ही गावातले लोक इथे मॉक पोल घेणार होतात. पण पोलिसांनी बंदी घातली, असा कोणता कायदा आहे? असा सवाल शरद पवार यांनी केला. उद्या जर तुम्ही ऐकायचं नाही असा निर्णय घेतला तर? असं म्हणत शरद पवार यांनी सूचक इशारा दिला. तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी कशी लागू होऊ शकते? असा सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. तसंच त्यांनी आवाहन केलं की, तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा. आम्हाला EVM ने मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू, असं शरद पवार म्हणाले.
काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. ते म्हणाले पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चूक? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे? मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, इथे राजकारण आणायचं नाही, आम्हाला लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन करायचं आहे असं पवार म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, की तुम्ही स्वत: या गावात या, लोकांना भेटा, त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल, तर त्यांना सहकार्य करा. गेले काही दिवस, जानकरांना झोप नाही, ते हाच मुद्दा मांडतात, मला माहिती नाही ते रात्री झोपेत काय बोलतात, असं म्हणत शरद पवारांनी मिश्किल टोलेही मारले.