मुंबई दि.२२ - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करण्यात आलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मानं मागं घेतली आहे. परंतू रेणू शर्मानं तक्रार अचानक मागं घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. यातच भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
धनंजय मुंडे यांनी तक्रार मागं घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच रेणू शर्मानं आपली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा आरोप उमा खापरे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका केली आहे.
अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिनं ही तक्रार मागं घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली आहे.
दरम्यान, शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारीरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र आज सकाळी रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलं.