भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडात १० बालकांचा होरपळून व गुदमरुन मृत्यू झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले. याबाबत नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीने रुग्णालयातील रिक्त जागा भरणे, जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्युत अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता नियुक्ती आणि जिल्हा रुग्णालयांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची शिफारस केली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षामध्ये लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या आगीच्या वेळी अग्निशमन दलाचे जवान, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक व टेलिफोन ऑपरेटर यांनी सात बालकांना तर वाचवलेच, शिवाय या शिशु कक्षाशेजारी असलेल्या अतिदक्षता विभाग व सिझेरियन विभागातील रुग्णांनाही अन्यत्र हलवल्याबद्दल विभागीय आयुक्तांच्या अहवालात कौतुक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेनंतर तातडीने भंडारा जिल्हा रुग्णालय तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे व सहा जणांची समिती नेमली होती. या समितीने तीन दिवसात अहवाल द्यावा असेही सांगण्यात आले होते. मात्र समितीने ११ दिवसांनी आपला अहवाल दिला असून या अहवालात नमूद केल्याप्रमाणे शिशू विभागातील रेडिएंट वॉर्मर कंट्रोल पॅनलमधील इलेक्ट्रिकल सर्कलमध्ये ठिणगी पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या ठिणगीमुळे गादी तसेच त्यावरील प्लास्टिक पेटले. प्लास्टिकमुळे दोन मिनिटात खोलीत धुर झाला. हा कक्ष बंद असल्यामुळे आग अन्यत्र पसरली नाही, मात्र तीन बालके होरपळून तर सात बालके धुरामुळे गुदमरुन मरण पावल्याचे अहवालात नमूद केले आहे.