Advertisement

भाजपच्या गटाला पराभव जिव्हारी लागला, विजयी गटावर लाठ्या-काठ्या, तलवारीने हल्ला

प्रजापत्र | Wednesday, 20/01/2021
बातमी शेअर करा

जळगाव:  जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वडगाव इथं ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर दोन गटामध्ये तुफान हाणामारीची घटना घडली. लाठ्या-काठ्या आणि तलवारी कोयत्याने एकमेकांवर भीषण हल्ला करण्यात आला. या धुमश्चक्रीत 3 जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव झाल्यामुळे विजयी उमेदवाराच्या पॅनलवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.
चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगाव ग्रामपंचायतीचा 18 जानेवारी रोजी निकाल लागला. प्रकाश निळकंठ पाटील पॅनलचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर विजयी उमेदवारांनी गावात ढोल ताश्याचा गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गुलाल उधळला. गावात विजयी उमेदवारांचे औक्षक करण्यासाठी जात असताना अचानक एक गटाने लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला.
 22 जणांनी विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकावर जोरदार हल्ला केला. समोर येईल त्याला लाठ्या-काठ्याने मारहाण करण्यात आली. त्यामुळे एकच धुमश्चक्री उडाली. समोरील गटातील एकाने तलवारीने वार केल्याचीही घटना घडली. या धुमश्चक्रीत 3 जण गंभीर जखमी झाले आहे.
या प्रकरणी  मेहूणबारे पोलीस स्टेशनमध्ये 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटानेही विजयी उमेदवार गटाविरोधात गुन्हा दाखल केला. मानसिंह पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजयी उमेदवाराने गावातून मिरवणूक काढली होती. आपल्या दारातून जात असताना चिथावणीखोर घोषणाबाजी केली आणि फटाके फोडले. त्यामुळे जाब विचारला असता मारहाण केली, असा आरोप केला आहे.

Advertisement

Advertisement